टूडेसाठी
-------------
फटाके स्टॉलच्या लिलावाला थंड प्रतिसाद
२४२ पैकी १२३ जागा पडून; रस्त्यांची कामे, खासगी मैदान ठरले कारण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : सिंहस्थानिमित्त शहरात विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे महापालिकेकडून शहरात उभारलेल्या फटाके स्टॉलच्या जागांच्या लिलावाला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. दोन टप्प्यात लिलाव घेऊनही २४२ पैकी केवळ ११९ जागांनाच व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, निम्म्याहून अधिक म्हणजे १२३ जागा अद्यापही रिकाम्याच आहेत. आता या उर्वरित जागा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त महापालिकेच्या सहाही विभागात १ ते ११ नोव्हेंबर या कालावधीसाठी फटाके विक्रीला परवानगी दिली आहे. यासाठी शहरात एकूण २४२ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. नाशिक रोड विभागात सर्वाधिक ६९, पश्चिम विभागात ६०, पंचवटी ४४, सिडको ४३, सातपूर विभागात २६ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. लिलावाच्या जागांसाठी विभागीय कार्यालय स्तरावर २१ ऑक्टोबरला पहिला लिलाव झाला. त्यात ९२ जागांनाच बोली लागली. त्यानंतर २२ ऑक्टोबरला फेरलिलाव झाला, त्यात २७ जागा निश्चित झाल्या. सिडको विभाग वगळता अन्य विभागात प्रतिसाद मिळाला नाही. येथे ३५ जागांचा लिलाव झाला. पंचवटी विभागात ४४ पैकी २७, नाशिक रोड विभागात ६९ पैकी ३६, सातपूर विभागात २६ पैकी ७ व पश्चिम विभागात ६० पैकी १४ जागांना प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्टॉलसाठी १५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली होती.
---------चौकट
‘खासगी बाजारात विक्री जास्त’
सिंहस्थामुळे शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यालगतच्या ज्या जागांवर दरवर्षी स्टॉल लागतात, तिथे आता खोदकाम, मुरूम आणि धुळीमुळे ग्राहक फिरकणार नाहीत, अशी भीती व्यापाऱ्यांना आहे. तर डोंगरे वसतिगृह मैदानासह अनेक खासगी मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात खासगी फटाके बाजार भरत आहेत. तिथे एकाच ठिकाणी ५० ते १०० स्टॉल, पार्किंग आणि जास्त गर्दी असल्याने ग्राहक तिकडेच वळतात. त्यामुळे महापालिकेच्या विखुरलेल्या जागांपेक्षा खासगी बाजारात विक्री जास्त होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
--------------------