टूडे साठी
---------------
अग्निशमन भरतीची निवड यादी दिवाळीनंतर
पहिल्या दिवशी २९३ उमेदवारांची शारीरिक चाचणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील १८६ पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. लेखी आणि शारीरिक चाचणीचे गुण एकत्र करून अंतिम निवड यादी दिवाळीनंतर जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
शहराची २५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि केवळ १०० अग्निशमन कर्मचारी अशी विदारक स्थिती असताना २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर १८६ पदांच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीला सोमवार (ता. २) पासून सुरुवात झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दल सक्षम करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची अट रद्द करत या भरतीस हिरवा कंदील दिला आहे. महापालिकेला एकूण ४२८ पदांची आवश्यकता असताना सध्या फायरमन आणि वाहनचालक संवर्गातील १८६ पदे भरली जात आहेत. पंचवटीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात सुरू झालेल्या तीन दिवसीय चाचणीसाठी पहिल्या दिवशी ३६१ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी २९३ जणांनी चाचणी दिली, तर ६८ जण अनुपस्थित राहिले. उपस्थितीचे प्रमाण ८१.१६ टक्के राहिले. एकूण १८०० उमेदवार या टप्प्यासाठी पात्र ठरले असून दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. ३) ५२४ जणांची चाचणी होणार आहे.
--------------------चौकट
अशा होत आहेत चाचण्या
८०० मीटर धावणे, ६० किलो वजनाच्या मानवी प्रतिकृतीसह ६० मीटर धावणे, ३५ फूट उंच शिडी चढ-उतार आणि २५ मीटर पोहणे या चार प्रकारात उमेदवारांची क्षमता तपासली जात आहे.फेब्रुवारीमध्ये नाशिकसह १३ केंद्रांवर १२० गुणांची लेखी परीक्षा झाली होती. आता लेखी आणि शारीरिक चाचणीचे एकत्रित गुण विचारात घेऊन दिवाळीनंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणार असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी स्पष्ट केले.
-------------------