पान-३ मेन
-----------
२ कॉफोटो आहे
ध्वजारोहण सोहळ्यावर होणार मंथन
पालकमंत्री घेणार सर्व यंत्रणांचा आढावा, उणिवांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२ : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. पण, सोहळ्यातील सुरक्षिततेचा अतिरेक व सोहळ्यापासून स्थानिकांना दूर राहावे लागल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठविली जात आहे. यासर्व पार्श्वूभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन लवकरच यंत्रणांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत सोहळ्यातील चांगल्या बाबी तसेच उणिवांवर मंथन केले जाईल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी (ता.३१) रामतीर्थावर ध्वजारोहण झाले. त्र्यंबकेश्वरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यानिमित्ताने राष्ट्रपतींनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली. सायंकाळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदाघाटावर महाआरती झाली. साडेसहा हजार आदिवासी बांधवांच्या हस्ते झालेल्या या गोदाआरतीची जागतिक स्तरावर नोंद झाली. परंतु ध्वजारोहण व गोदाआरतीत सहभागी होता न आल्याने नाशिककरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही अशीच स्थिती होती.
ध्वजारोहणानंतर सुरक्षिततेच्या नावाखाली अतिरेक झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रशासनाने पास देऊनही जनतेला कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप होत आहे. गोदाघाटावर आमदार- खासदार, नगरसेवक व निमंत्रितांना जागेअभावी त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून रविवार कारंजा, पंचवटी परिसरासह शहराच्या मध्यवर्ती भागातील छोट्या-छोट्या गल्ली बॅरिकेटींग करून बंद करण्यात आल्या. परिणामी स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने छोटे-मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचा रोजगार बुडाला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे. यासर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता नियोजनावर मंथन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेत आठवड्याभरात बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये सोहळ्याचे नियोजनात सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांना त्यांना आलेले अनुभव, उणिवा तसेच चांगल्या बाबींवर उहापोह होणार आहे. या चर्चेतून पुढे येणाऱ्या सूचना व परिणामकारक गोष्टींचा अवलंब करून आगामी प्रमुख अमृतस्नान पर्वण्यांचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
---
२०-२ चौकट
या बाबींवर होणार विचारमंथन
- गर्दी नियोजनाच्या आराखडा तयार करणे
- प्रमुख मार्गांवर मार्गदर्शक फलक लावणे
- स्थानिकांचा सहभाग अधिकाधिक वाढविणे
- सुरक्षिततेच्या अतिरेक टाळण्याबाबत उपाययोजना
-------------------