वीकेंडला हवाई सेवेचे प्रवास महागला

वीकेंडला हवाई सेवेचे प्रवास महागला
Published on: 
नाशिककरांच्या हवाई प्रवासाला महागाईची झळ वीकेंडला तिकिटांचे दर दुपट्टं दिल्लीचे तिकीट १८ हजारांवर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : दिवाळीनंतर कामावर परतणारे चाकरमानी आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने नाशिक विमानतळावरील हवाई प्रवास महागला आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या मार्गांवरील वीकेंडच्या तिकिटांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून दिल्लीचे तिकीट थेट १८ हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यातच गुरुवारी (ता. १२) अहमदाबादहून नाशिकला येणारे विमान ऐनवेळी रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून थंडीची चाहूल लागल्याने उत्तर आणि दक्षिण भारतातील पर्यटनाचे नियोजनही वाढले आहे. परिणामी, नाशिकहून उपलब्ध असलेल्या हवाई सेवांना प्रवाशांची पसंती मिळत आहे. वाढती मागणी लक्षात घेता इंडिगोने वीकेंडच्या तिकिटांचे दर वाढविले आहेत. नाशिक-दिल्ली मार्गावर सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विमानसेवा उपलब्ध आहेत. मात्र, या मार्गावरील तिकिटांचे दर ८ हजार ७०० रुपयांवरून १८ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अहमदाबादसाठी वीकेंडचे तिकीट १३ हजार १२४ रुपयांवर गेले असून सोमवारनंतर (ता. १६) हेच दर ५ ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. हैदराबादसाठी ५ हजार ९६२ ते ७ हजार ११७ रुपये, तर बंगळुरूसाठी वीकेंडचे तिकीट ८ हजार ८८९ रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी विमानप्रवास करणाऱ्या नाशिककरांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. गोवा विमानसेवा बंद; नाशिककरांचा हिरमोड नाशिक-गोवा मार्गावरील इंडिगोची नियमित विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून बंद झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत थेट विमानाने गोवा गाठण्याचे नियोजन करणाऱ्या नाशिककरांचा हिरमोड झाला. थेट सेवा बंद झाल्याने पर्यटकांना मुंबई गाठून तेथून विमानाने किंवा कोकण रेल्वेने गोव्याला जाण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. वाढलेले तिकीट दर, ऐनवेळी रद्द होणारी विमाने आणि बंद झालेली गोवा सेवा यामुळे नाशिककरांच्या हवाई प्रवासाचे गणितच बिघडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.