नाशिक: जिल्ह्यात तीन दिवसांच्या संततधारेनंतर शुक्रवारी (ता. २२) पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. गंगापूर धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने गोदाघाटावरील पूरस्थिती निवळली. अन्य धरणांच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने कपात केली जात आहे. दरम्यान, गोदावरी नदीला आलेल्या महापुरात चांदोरी ग्रामपालिकेचा पाच हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर वाहून गेला. तो शुक्रवारी (ता. २२) खाणगाव थडी येथील ग्रामस्थांना आढळून आला.