पान चार
-------------------
31524
नाशिक : असे असेल फुटबॉलचे प्रस्तावित मैदान..
मानेनगरला होणार सुसज्ज फुटबॉलचे मैदान
कान्हेरे मैदानावर फ्लडलाईट, पालकमंत्री महाजन यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ः क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा विकसीत करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय जिल्हा नियोजन समितीअंतर्गत घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे पंचवटी परिसरातील मानेनगर येथील जागेत राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत फुटबॉल मैदान विकसित करण्यास तसेच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रात्रीच्या सामन्यांसाठी अत्याधुनिक विद्युत झोत (हाय-मास्ट फ्लडलाईटस्) सुविधा उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी माहिती दिली.
गेल्या काही वर्षांत नाशिकने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू, क्रिकेटपटू आणि विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू घडविले आहेत. उच्च दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधासाठी खेळाडूंना सरावासाठी मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांकडे जावे लागत होते. आता पालकमंत्री महाजन यांच्या पुढाकारामुळे नाशिकमधील खेळाडूंना स्थानिकस्तरावर उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होत आहेत. मानेनगर परीसरात ८ एकर जागा उपलब्ध आहे. येथे उभारल्या जाणाऱ्या फुटबॉल मैदानामध्ये उच्च दर्जाच्या लॉनसह ड्रेनेज सिस्टिम, पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आणि मैदानाच्या मानक आकारानुसार आवश्यक सुविधा विकसित केल्या जातील. त्यामुळे खेळाडूंना नियमित व दर्जेदार सरावासाठी मैदान उपलब्ध होईल. सामान्य व खडबडीत मैदानावर खेळताना होणाऱ्या दुखापतींचे प्रमाण कमी होण्यास या मैदानामुळे मदत होईल.
यासह हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक हाय-मास्ट फ्लडलाइट्समुळे नाशिकच्या क्रिकेटपटूंना रात्रीच्या प्रकाशात सराव करण्याची सुविधा मिळेल. या सुविधेमुळे नाशिकमध्ये रात्रीचे सामने खेळविता येतील. या उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधांमुळे नाशिकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. नाशिकच्या खेळाडूंची शारीरिक क्षमता, खेळाची गती आणि तांत्रिक कौशल्य अधिक विकसित होण्यास मदत होईल. या अद्ययावत प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.