फोटो : H32323
नाशिक : इमारतीच्या गॅलरीनजीकच्या जागेत अटकेच्या भीतीने उभा असलेला संशयित सुनील शिरसाठ.
--
अटक टाळण्यासाठी गॅलरीतून उडी मारण्याची धमकी
नाशिक रोडला थरार; गुन्हे शाखेकडून शिताफीने अटक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : अहिल्यानगर जिल्ह्यात फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित नाशिक रोड परिसरात दडून बसला असता, नाशिक रोड गुन्हे शाखेचे पथक त्यास अटक करण्यासाठी गेले. त्या वेळी संशयिताने अटक टाळण्यासाठी अपार्टमेंटमधील फ्लॅटचा गॅलरीतून उडी मारण्याची धमकी पोलिसांना दिली. परंतु पथकाने शिताफीने त्याला जेरबंद केले. मंगळवारी (ता. १३) रात्री नाशिक रोड परिसरात हे थरारनाट्य रंगले होते.
सुनील शिरसाट (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे संशयिताचे नाव आहे. संशयित सुनील शिरसाट याने पाथर्डी पतसंस्था सुरू करून अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात एमपीआयडी अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु संशयित शिरसाट हा काही महिन्यांपासून पसार होता. दरम्यान, पाथर्डी पोलिसांना संशयित शिरसाट हा नाशिक रोड परिसरात दडून बसला असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नाशिक शहर गुन्हे शाखेशी संपर्क साधला होता.
त्यानुसार, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने उपनगर हद्दीतील रुद्र हाईटस्मधील फ्लॅटवर धाड टाकली असता, संशयित शिरसाट याने गॅलरीतून बाहेर जात, अटक करण्याचा प्रयत्न केल्यास खाली उडी मारण्याची धमकी पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन विभागाला खबर दिली असता, तेही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमनाच्या जवानांनी शिडी लावण्याचा प्रयत्न केला असता, तेव्हाही त्याने उडी मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याचे लक्ष विचलित करीत त्याला ताब्यात घेतले. संशयित शिरसाटला ताब्यात घेण्यासाठी पाथर्डी पोलिस मध्यरात्रीला पोहोचले असता, त्यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
--चौकट
सासुरवाडी नाशिकची
संशयित शिरसाट हा मूळचा पाथर्डी (जि. अहिल्यानगर)चा आहे. काही वर्षांपूर्वी त्याने पाथर्डीत पतसंस्था सुरू करून त्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. तर, शिरसाठची सासुरवाडी नाशिक रोडची आहे. त्यामुळे तो उपनगर हद्दीतील सासुरवाडीला लपून बसला होता. मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे पाथर्डी पोलिसांना त्याचा ठावठिकाणा माहीत झाल्याने त्यांनी ही खबर सहायक आयुक्त संदीप मिटके यांना दिली होती.