आगीत फर्निचर शोरुमचे
२८ लाखांचे नुकसान
नाशिक, ता. ११ : गंगापूर रोडवरील ऋषिराज रिजेन्सी इमारतीमधील ओम ग्लास ॲन्ड मॉड्युलर किचन या फर्निचर शोरूमला शनिवारी (ता. १०) सकाळी आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये तब्बल २८ लाख ७० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ओमप्रकाश घिसालाल जांगीड (४५, रा. पोकार कॉलनी, दिंडोरी रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल नजिक ऋषिराज रिजेन्सी ही इमारत आहे. या इमारतीमध्ये जांगीड यांचे फर्निचरचे शोरुम आहे. शनिवारी सकाळी सुरक्षारक्षक सचिन देशमुख यांना दुकानातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तत्काळ जांगीड यांना दिली. अग्निशमन दलाही घटनेची माहिती दिली असता, दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. आसपासच्या व्यावसायिकांनी दुकानाची काच फोडून फायर फायटिंग पावडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे कुलूप उघडल्यानंतर आत आगीचा भडका झाला होता. अग्निशामक दलाच्या बंबाने आग पूर्णपणे विझवली. मात्र यात २८ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.