टोळक्याचा तरुणावर
धारदार शस्त्राने हल्ला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : गांधीनगर मैदानावर रावणदहन पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाज्यांना समजावून सांगणे एका तरुणाला महागात पडले आहे. संशयित टोळक्याने युवकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.
श्रीकांत दीपक तायडे (२१, रा. श्रमनगर, पगारे मळा, उपनगर) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २०) श्रीकांत व त्याचा मित्र हे गांधीनगर मैदानावर रावण दहन पाहण्यासाठी गेले असता, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयित टोळके तरुणीची छेडछाड करीत होते. त्यामुळे श्रीकांत याने संशयितांना समजावून सांगितले. त्यांनतर श्रीकांत हा त्याच्या मित्राला सोडवण्यासाठी रामदास स्वामी नगर येथे गेले असता, रात्री साडेआठच्या सुमारास तिथेच गप्पा मारत होते. त्यावेळी दोन दुचाक्यांवरून तेच संशयित टोळके आले आणि त्यांनी श्रीकांत व त्याच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. तर दोघांनी श्रीकांतला धरून ठेवत एकाने त्याच्याकडील धारदार हत्याराने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर संशयित पसार झाले. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, हवालदार आतिश पवार तपास करत आहेत.