एकाच दिवशी तिघींच्या
सोनसाखळी ओरबाडल्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : शहर-परिसरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवारी (ता. १०) अवघ्या काही तासांच्या अंतरात मुंबई नाका आणि उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे दागिने हिसकावल्याच्या तीन घटना घडल्या.
शहरात सतत घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिला घराबाहेर पडायच्या कशा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिल्या घटनेत विधातेनगर, रविशंकर मार्ग येथील राहणाऱ्या सुनीता रामा राठोड या शनिवारी रात्री देवदर्शन आटोपून व भाजीपाला घेऊन घराकडे जात होत्या. याच दरम्यान, दुचाकीवरील दोन भामट्यांनी अचानक त्यांच्याजवळ येत गळ्यातील १ लाख रुपये किमतीची १३ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. दुसऱ्या घटनेत सुचितानगरमधील रहिवासी पूजा विकास नरवाडे ( २७) शनिवारी सायंकाळी पायी घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने ओढून नेले. एकापाठोपाठ एक घडलेल्या या दोन्ही गुन्ह्यांची मुंबई नाका पोलिसांनी नोंद केली आहे. केवळ मुंबई नाकाच नव्हे, तर उपनगर ठाण्याच्या हद्दीतही चोरांनी उच्छाद मांडला आहे. ॲड. प्रत्युषा बाळासाहेब मेंढीकर या मंदिरावरून दर्शन घेऊन परतत असताना, काळ्या रंगाच्या यामाहा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.