Humanity better than any religion
Humanity better than any religionsakal

नाशिक : कोणत्याही धर्मापेक्षा मानवता धर्म सर्वश्रेष्ठ

स्वामी सोमेश्‍वरानंद : हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

नाशिक : आपण सर्व भारतीय प्रथमतः एक आहोत. जगात मानवता धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ असून तो सतत जागृत राहावा, असे प्रतिपादन बेझे (ता.त्र्यंबकेश्‍वर) येथील श्री पंचायती निरंजन आखाडाप्रणीत श्रीराम शक्तिपीठाचे पीठाधीश्‍वर महामंडलेश्वर स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी शनिवारी केले.

श्रीराम शक्तिपीठातर्फे दरवर्षी श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. शोभायात्रेचे हे आठवे वर्ष आहे. यात्रेत हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक रामसिंग बावरी यांच्यासह महाराजांचे जिल्हाभरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी असलेली श्री हनुमानाची पंधरा फुटी भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी सहा वाजता वाकडी बारव येथून शोभायात्रेला सुरवात झाली.

‘जय श्रीराम’, ‘रामभक्त हनुमान की जय’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दूध बाजार चौकातील प्राचीन श्री पंचदेव गणेश मंदिरात महाराजांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना स्वामी सोमेश्‍वरानंद यांनी सर्वच धर्माचा प्रचार, प्रसार व्हावा. परंतु त्यासाठी वातावरण निकोप असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शोभायात्रेत हनुमान चालिसाचे अखंड पठण चालू होते. शोभायात्रेत भद्रकाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आदिवासी नृत्याने वेधले लक्ष

शोभायात्रेत पेठ तालुक्यातील धान्याचा पाडा येथील सोंगी मुखवटा पथक सहभागी झाले होते. पथकाच्या आदिवासी सोंगी मुखवटा पथकाच्या तालबद्ध नृत्याने शोभायात्रेची रंगत वाढविली. पथकात तीस लोक सहभागी झाले होते. याशिवाय शिस्तबद्ध महिला पथक, ढोल ताशे व इतर पारंपारिक वाद्याने शोभायात्रेची रंगत वाढविली.

हिंदू- मुस्लिम धर्मातील विश्‍वास वाढावा

हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षी वाकडी बारव येथून सायंकाळी या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. शोभायात्रेचे हाजी युनूस तांबोळी आदी मुस्लिम बांधवांतर्फे दरवर्षी यात्रेचे स्वागत करून स्वामी सोमेश्‍वरानंद यांचा सत्कार करण्यात येतो. आजही हाजी युनूस तांबोळी आदी मुस्लिम बांधवांनी यात्रेचे स्वागत करून स्वामींचा हार घालून सत्कारही केला. दोन्ही धर्मातील कोणाचाही सण असो, त्याद्वारे धर्माधर्मातील विश्‍वास वाढावा, जेणेकरून सामाजिक शांतता अबाधित राहाते, असे मत हाजी तांबोळी यांनी व्यक्त केले. यावर स्मावी सोमेश्‍वरानंद यांनीही संविधानाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भाऊ- भाऊ म्हणून राहात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com