फोटो : 31201
नाशिक : उन्नत नाशिक अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप करताना मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनिषा खत्री
कुसमाडी पॅटर्नमधून हरित नाशिक संकल्पनेला बळ
पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : उन्नत नाशिक अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नाशिक, समृद्ध नाशिक’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी कुसमाडी पॅटर्न अंतर्गत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना वृक्ष व साडीचे वाटप करण्यात आले.
‘हरित नाशिक, समृद्ध नाशिक’ या संकल्पनेतून पर्यावरणपूरक विकासाला चालना देतानाच वृक्षलागवड आणि वृक्षांचे संगोपन याबाबत लोकसहभाग वाढविण्यावर या उपक्रमातून भर देण्यात येत आहे. मंत्री महाजन म्हणाले, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा देखणे, नगरसेवक दिनकर पाटील आदी उपस्थित होते.