लयबद्ध नादाला
रसिकांची दाद
नाशिक : नादब्रहृमवासी तालमणी पं. जयंत नाईक यांना नाद सुमनांजली अर्पण करण्यासाठी रविवारी (ता.२५) आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात शिष्यांच्या सुरेल सादरीकरणाने ताल नाद रंगतदार ठरला त्याला उपस्थित श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. शालिमार येथील आय.एम.ए. हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात पं. नाईक यांचे शिष्य ओंकार भुसारे, भूषण जगताप, मांगल्य देवरे, तेजल जगताप, कार्तिकी अहिरे यांनी तबल्यावर कायदा, रेले सादर केले.
लौकिक संत, कौस्तुभ नेमाडे यांची जुगलबंदीने कार्यक्रमाला रंगत आली. श्लोक गाडेकर, आयुष जगताप, सोहम चंद्रमोरे , श्रीहर्ष कुलथे यांनी जयताल सादर करून रसिकांना मोहिनी घातली. साहिल टकाटे याने ड्रम आणि कौस्तुभ स्वाई यांच्या आगळ्या वेगळ्या जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात चित्रा नाईक, अमोल नाईक यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पं. अविराज तायडे, पं. सुभाष दसककर, नितीन पवार, राजन भावसार, शुभांगी भावसार उपस्थित होते. कार्यक्रमात अमोल नाईक, आदित्य कुलकर्णी, देवेंद्र गुरव, सचिन जगताप, स्वप्नील भिसे यांच्या शिष्यांनी आपली तबला कला अप्रतिमपणे सादर केली. गायन सागर कुलकर्णी यांनी केले. अभिजित भाटजिरे, सौरीश कबीर यांनी साथसंगत केली. निवेदन डॉ. श्रीपाद घोलप, मृणाल जोशी यांनी केले.
----------