फोटो : 33714
नाशिक ः सीईओ ओमकार पवार यांचे अभिनंदन करताना आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी.
...
कंत्राटी कर्मचाऱ्यांना
समकक्ष वेतनश्रेणी
नाशिक, ता.२७ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दहा वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील ५४२ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने एकवेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास आणि अन्य विभागांतील समकक्ष नियमित मंजूर पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार वेतनश्रेणी देण्यात येईल. अपेक्षित वेतनासाठी आणि प्रवास भत्त्यासाठी राज्य स्तरावर पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कर्मचाऱ्यांचे सध्या मिळणारे मूळ वेतन संरक्षित राहील. त्यांना महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेंतर्गत सध्या देय असलेल्या रजाही अनुज्ञेय असतील. मात्र, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना तसेच सेवानिवृत्ती अथवा कुटुंब निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळणार नाही. संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच ती अस्तित्वात राहतील. कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यास ते व्यपगत होईल आणि त्यावर नव्याने नियुक्ती केली जाणार नाही. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीही अनुज्ञेय राहणार नाही. शासनाने या पदनिर्मितीला अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून मान्यता दिली असून, अन्य विभागांतील कोणत्याही योजना किंवा प्रयोजनासाठी याचा पूर्वोदाहरण म्हणून वापर करता येणार नाही.
----------
कोट
या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख होण्यास मदत होईल.
-ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद--