esakal | Nashik: नको नको रे पावसा...अंत आता पाहू...पावसाचा रुद्रावतार
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा रुद्रावतार
चिचोंडी : नको नको रे पावसा...अंत आता पाहू...पावसाचा रुद्रावतार

चिचोंडी : नको नको रे पावसा...अंत आता पाहू...पावसाचा रुद्रावतार

sakal_logo
By
प्रमोद पाटील

चिचोंडी : यावर्षी सुरुवातीला तालुक्याच्या पश्चिम भागावर तीन महिने रुसलेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाल्याने आता 'नको नको रे पावसा..' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काल येवला तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागात धुव्वाधार बरसलेल्या पाऊसाने आज शनिवार (दि.९) तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना अक्षरशः झोडपून काढले. दुपारी दोन वाजेला मेघगर्जनेसह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तासाभरात पाणी पाणी केले. नद्या, नाले, ओढे, शेतीतुन पाणी वाहिले.

चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, साताळी, निमगाव मढ, बदापूर, रायते या परिसराला अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. पोळ्यापर्यंत या भागातील शेतकरी मोठ्या पाऊसाची आस लावून होता. मात्र महिन्यात बरसलेला पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मका, सोयाबीन, बाजरी, कांदा,कापूस, भुईमूग पिकांचे पूर्णतः नुकसान झाले. उन्हाळ कांद्याची रोपे पावसामुळे खराब झाली. तर चिचोंडी खुर्द येथील पर्णकुटी मंदिरापर्यंत पाणी पावसाचे पाणी गेले.

हेही वाचा: मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील अडथळा दूर

आधीच हातातून गेलेली पिके आजच्या पावसाने पूर्णता बेचिराख झाली. चिचोंडी येथील ज्ञानेश्वर पवार, सुनिल पवार, गहिनीनाथ मढवई यांचे कांदा पीक वाहून गेले तर चिचोंडी खुर्द येथील प्रमोद सैद, राजेंद्र गोरे, निवृत्ती मढवई, संदीप जाधव यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचे कांदा पीक गुडघाभर पाण्यात आहे. साताळी येथील बबन काळे यांचा काढून ठेवलेला भुईमूग पाण्याबरोबर वाहून गेला. सततच्या पावसामुळे कांदा पिकावर फवारणी करूनही उपयोग होत नाही त्यात आजच्या पावसाने मोठी भर टाकल्याने उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहे. आता सरकारने या परिसरातील शेतीचे त्वरित सरसगट पंचनामे करून बळीराजाला या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी होत आहे.

" मागील पावसातून कसे बसे सावरायला सुरुवात केली. कांद्यावर औषधे मारून पडलेले पिळ व मुळी साठी मात्रा दिली मात्र आजच्या धुव्वाधार पावसाने सर्व खर्चावर पाणी फिरले, सर्व पाण्यात व रोप वाहून गेले."

- सुनील पवार, चिचोंडी बुद्रुक

" पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने काढून ठेवलेला भुईमूग डोळ्यासमोर पाण्यासोबत वाहून गेला. तर काही पाण्यावर तरंगला."

- बबन काळे, शेतकरी, साताळी ता.येवला

loading image
go to top