फोटो : H35066
--
कार्तिक मासनिमित्त विशेष हेरिटेज वॉक
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उलगडला ऐतिहासिक ठेवा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : ‘कार्तिक मास विशेष’निमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे ‘गोदा वारसा दर्शन’ या विशेष हेरिटेज वॉक झाला. श्री काळाराम मंदिर येथून सकाळी ७ वाजता या वारसा फेरीचा प्रारंभ झाला. हेरिटेज वॉकमध्ये नाशिकच्या गोदाकाठावरील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांचा समृद्ध वारसा उलगडण्यात आला.
फेरीदरम्यान प्राचीन श्री काळाराम मंदिर, श्री शारदा चंद्रमौलेश्वर मंदिर, सीतागुफा, राम- लक्ष्मण गुंफा, श्री दत्तमंदिर, कालभैरव मंदिर, विठ्ठल मंदिर तसेच श्री शृंगेरी शंकराचार्य मठ या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रत्येक स्थळाचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि त्यामागील सांस्कृतिक परंपरा यांची सविस्तर माहिती जाणून घेण्याची संधी सहभागी नागरिकांना मिळाली. नाशिकच्या गोदाकाठाचा समृद्ध इतिहास, प्राचीन मंदिरांची स्थापत्यशैली आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. केवळ पर्यटन न करता आपल्या शहराचा इतिहास जाणून घेण्याचा आणि वारसा जतन करण्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम ठरला. या हेरिटेज वॉकची सांगता भक्तिमय नामसंकीर्तनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांना सुंदर अशा प्रसादाचे वाटप करण्यात आले. इतिहास, अध्यात्म आणि संस्कृती यांचा सुंदर संगम घडवणारा हा ‘गोदा वारसा दर्शन’ उपक्रम उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. यावेळी इतिहास अभ्यासक देवेंद्रनाथ पंड्या, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष श्री महंत नृसिंह कृपादास प्रभुजी आणि इतिहास अभ्यासक अंजली वेखंडे यांची विशेष उपस्थिती लाभली.