जंगल आहे; तरी वन्यजीव गावाच्या वाटेवर!

जंगल आहे; तरी वन्यजीव गावाच्या वाटेवर!
Published on: 
मेन लोगो : वन्यजीव सप्ताह विशेष --- जंगल आहे; तरी वन्यजीव गावाच्या वाटेवर! मानव- वन्यजीव संघर्ष; पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात ३१ मृत्यू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : नाशिक जिल्ह्याला तब्बल ४,९२८.४४३ चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र लाभलेले आहे. कागदावर पाहता हा मोठा वनसाठा आहे; मात्र या जंगलाची सलगता, वन्यजीवांचा अधिवास आणि जंगलालगत वाढलेली शेती यांच्यातील संघर्ष आता नाशिकच्या निसर्ग संवर्धनापुढील गंभीर प्रश्न बनला आहे. वनक्षेत्राचे तुकडे झाल्याने जंगल आणि मानवी वस्ती यांच्यातील नैसर्गिक अंतर कमी होत असून त्याचा सर्वाधिक फटका बिबट्या आणि माणूस या दोघांनाही बसत आहे. वन विभागाच्या पश्चिम नाशिकच्या कार्ययोजनेतही जंगलांचे तुकडीकरण आणि त्याभोवती असलेले शेती क्षेत्र ही वन्यजीव व्यवस्थापनातील आव्हाने ठरत असून याची किंमत मानवी जीविताच्या रूपाने मोजावी लागत आहे. केंद्र सरकारच्या नोंदीनुसार २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांत नाशिक जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्षात ३१ जणांचा मृत्यू आणि ३८ जण जखमी झाले. त्यातील २०२५-२६ मध्येच नऊ मृत्यू आणि १७ जखमी झाल्याची नोंद आहे. म्हणजेच संघर्षाची तीव्रता कमी होण्याऐवजी अलीकडच्या काळात गंभीर घटनांची नोंद कायम आहे. ---चौकट जंगलाच्या कडेवर नवा अधिवास नाशिकच्या ग्रामीण पट्ट्यात ऊस आणि इतर पिकांचे मोठे क्षेत्र आहे. उसासारख्या दाट पिकांमध्ये बिबट्यांना आडोसा आणि भक्ष्य उपलब्ध होते. त्यामुळे जंगल हा बिबट्याचा एकमेव अधिवास राहिलेला नाही. जंगल, शेती आणि मानवी वस्ती यांच्यामधील संक्रमण क्षेत्रात वन्यजीवांचा वावर वाढत आहे. मागील वर्षी पळसे परिसरात अवघ्या काही आठवड्यांत चार बिबटे पकडले गेले, तर सहा महिन्यांत जिल्ह्यात सुमारे २५ बिबट्यांचे रेस्क्यू करण्यात आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले. ---चौकट संघर्ष टाळण्यासाठी काम व्हावे एखादा बिबट्या वस्तीत शिरल्यानंतर पिंजरा लावणे, कॅमेरा बसविणे किंवा त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये हलविणे हा संघर्षाचा तात्कालिक उपाय आहे. पण तो बिबट्या वस्तीकडे आला का, त्याचा अधिवास कुठे तुटला, जंगलातील कोणते मार्ग बंद झाले आणि वनक्षेत्राभोवती कोणत्या मानवी हालचाली वाढल्या, हा मूळ पर्यावरणीय प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यासाठी वन विभागाला २०२६ मध्ये थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, पिंजरे आणि अन्य बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र ही साधने संघर्षानंतरची यंत्रणा बळकट करतात; संघर्ष होऊच नये यासाठी काम करण्याची गरज आहे, असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. ---कोट वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने असे विचारावेसे वाटते की, ४,९२८ चौ.किमी. वनक्षेत्र असतानाही वन्यजीवांना जंगलाबाहेर यावे लागत असेल, तर त्या जंगलाची सलगता, अधिवास आणि नैसर्गिक मार्ग किती सुरक्षित आहेत? याचे उत्तर शोधणे हीच निसर्ग संवर्धनाची खरी कसोटी ठरणार आहे. -प्रदीप साळुंके, वन्यजीव अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com