'महिला' डॉक्‍टरांना संघटनेत नेतृत्‍वाची संधी

डॉ. प्रसादसिंग : आयएमए अध्यक्षपदी डॉ. पाटील, सचिवपदी डॉ. पवार
Women doctors opportunity to lead organization
Women doctors opportunity to lead organizationsakal

नाशिक : देशपातळीवर आरोग्‍य क्षेत्रात महिला डॉक्‍टरांचेही आमूलाग्र योगदान राहिले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्‍टरांच्‍या संघटनेत उचित स्‍वरूपात महिला डॉक्‍टरांना प्रतिनिधित्‍व करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्‍यासाठी महाराष्ट्र संघटनेने पुढाकार घ्यावा. आगामी काळात दर तीन-चार वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर महिला डॉक्‍टरांची निवड केली जाईल. संघटन पातळीवर महिला डॉक्‍टरांना नेतृत्‍वाच्‍या संधी उपलब्‍ध आहेत, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सहजानंद प्रसादसिंग यांनी केले.

शालिमार येथील आयएमए सभागृहात झालेल्‍या इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेच्‍या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. राजश्री पाटील यांनी, तर सचिवपदाची जबाबदारी डॉ. विशाल पवार यांनी स्‍वीकारली. आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, मावळते अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, मावळत्‍या सचिव डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ यांच्‍यासह नूतन पदाधिकारी उपस्‍थित होते.

डॉ. सहजानंद प्रसादसिंग म्‍हणाले, की गरजू रुग्‍णांना परवडेल, अशा दरात डॉक्‍टरांनी उपचार करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. डॉक्‍टरांपुढील समस्‍यांबाबत संघटना पाठपुरावा करीत आहे. डॉक्‍टरांवरील होणाऱ्या हल्ल्‍यांसंदर्भात याचिका दाखल असून, कठोर कायद्यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

डॉ. वानखेडकर म्‍हणाले, की महिला डॉक्‍टरांचे प्रमाण सुमारे ५० टक्‍के आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करून आयएमएची प्रगती साधणे अशक्‍य आहे. हरियाणा, ओडिसा, आसाम राज्‍य आयएमएमध्ये महिला डॉक्‍टर अध्यक्ष, सचिव यांसारख्या पदांवर कार्यन्‍वित आहेत. तर महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्‍यांमध्येही महिला डॉक्‍टरांना संधी मिळण्याची आवश्‍यकता त्‍यांनी व्‍यक्‍त केली. डॉ. सुहास पिंगळे म्‍हणाले, की नाशिक आयएमएचे काम नेहमीच प्रभावी राहिले आहे. येत्‍या काळातही संघटन पातळीवर स्‍थानिक शाखेचे भरीव योगदान राहिल. डॉ. मंगेश थेटे यांनी परिचय करून दिला. डॉ. विक्रांती मोरे, डॉ. नीलेश जेजुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

सांघिक परिश्रमातून घडले कार्य : डॉ. सोननीस

कामाचा आढावा सादर करताना मावळते अध्यक्ष डॉ. सोननीस म्‍हणाले, की कोरोना महामारीसारख्या आव्‍हानात्‍मक काळात सांघिक परिश्रमातून चांगली कामगिरी बजावता आली. डॉक्‍टरांवरील हल्ल्‍यांचा तीव्र निषेध करताना मेडिको लीगल सेलची स्‍थापना केली. डॉक्‍टर दिनानिमित्त आरोग्‍य क्षेत्रातील सर्व घटकांना सन्‍मानित केले. संघटनेच्‍या घटनेत आवश्‍यक त्‍या दुरुस्‍त्‍या करताना धर्मदाय आयुक्‍तांना मसूदा सादर केला. राष्ट्रीय स्‍तरावरील क्रीडा स्‍पर्धा यशस्‍वीरी पार पाडल्‍याचे सांगत त्‍यांनी सर्वांचे आभार मानले.

आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करण्यावर भर : डॉ. पाटील

नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील म्‍हणाल्‍या, की डॉक्‍टरांवरील हल्‍ला खपवून घेतला जाणार नसून अन्‍य विविध प्रश्‍नांची प्राधान्‍याने सोडवणूक केली जाईल. सर्वांच्‍या सहकार्याने येत्‍या वर्षभरात आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार त्‍यांनी व्‍यक्‍त केला. आयएमए अध्यक्षपदाची जबाबदारी भूषविणाऱ्या त्‍या चौथ्या महिला डॉक्‍टर ठरल्‍या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com