मूलभूत सुविधांसाठी मनपास
२० कोटींचा निधी मंजूर
---------------
पश्चिम विधानसभा कार्यक्षेत्रात लाभ होणार
-----------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : शहरातील मूलभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी नगरविकास विभागाने नाशिक महापालिकेला २० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेंतर्गत हा निधी मिळणार असून, त्याचा वापर प्रामुख्याने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांतील विकासकामांसाठी होणार आहे.
---------------
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पायाभूत सुविधांना गती मिळत असतानाच या निधीमुळे प्रभाग पातळीवरील नागरी सुविधांनाही चालना मिळणार आहे. सर्वांत मोठी तरतूद सदिच्छानगर येथील जलतरण तलावाच्या उर्वरित कामांसाठी करण्यात आली असून, त्यासाठी तब्बल १० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. त्याखालोखाल माहेरघर मंगल कार्यालय येथे पूल बांधण्यासाठी १.४० कोटी, इच्छामणी कॉलनीतील रस्ता काँक्रीटीकरणासाठी १ कोटी रुपयांची तरतूद आहे. कामटवाडे स्मशानभूमी विकास, सिंहस्थनगर व दत्त चौक येथील सामाजिक सभागृह, आनंदवल्ली येथील स्मशानभूमी व दशक्रिया शेड, श्रीरामनगर फुले मळा येथील खेळाचे मैदान, संभाजीनगर येथील सभामंडप, पवननगर मैदान येथील जॉगिंग ट्रॅक, सोमेश्वर कॉलनी व अहिल्याबाई होळकर चौक येथील सभामंडप, अश्विनीनगर येथील सभागृह, अंबड स्मशानभूमी विकास, सातपूर भाजी मार्केटमधील शौचालय, सोमेश्वर कॉलनीतील सामाजिक डोम, गणेश कॉलनीतील फरशी, वृंदावननगर, देवकीनंदन व वासुदेवानंद सोसायटीतील सभागृह, माधवनगर येथील जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिक संघ हॉलचे नूतनीकरण, डॅफोडिल्स सोसायटी, शिवनेरी चौक व पंडितनगर येथील मैदाने आणि श्रीकृष्ण चौक येथील सभामंडप या कामांचा समावेश आहे.
संपूर्ण निधीचा भार राज्य शासन उचलणार असून अंमलबजावणी महापालिकेमार्फत होणार आहे. सर्व कामांसाठी ई-निविदा अनिवार्य असून खर्च वाढल्यास अतिरिक्त निधी मिळणार नाही. निधीचा योग्य वापर, कामांचा दर्जा आणि मंजूर कामांनुसारच खर्च होत असल्याची खातरजमा जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागणार असून, कामांपूर्वी व नंतरची छायाचित्रे आणि त्रयस्थ लेखापरीक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.
------------