टूडे साठी
-------------
कारागृहातील जलव्यवस्थापन यंत्रणेची तपासणी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२०० बंदिवानांना पुरविल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार पसरण्याची भीती कारागृह प्रशासनाने व्यक्त केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता पाण्याचे नमुने तपासण्याबरोबरच कारागृहातील अंतर्गत जलव्यवस्थापन यंत्रणेचीही तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडून ऑक्टोबर महिन्याचा अहवाल सादर करण्यात आला असून, त्यात स्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
कारागृह अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठविले होते. कारागृहात न्यायाधीन आणि शिक्षाबंदी मिळून सुमारे ४२०० कैदी असून त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे पाणी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश असून पाणी दूषित असल्यास जुलाब, ताप यांसह विविध जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. कारागृहासारख्या बंदिस्त परिसरात संसर्गजन्य आजार पसरल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे मोठे आव्हान ठरू शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाण्याची गुणवत्ता तातडीने तपासून अहवाल द्यावा, अशी विनंती करण्यात आली होती.
-----------------------चौकट
ऑक्टोबरला अहवाल शुध्द पाण्याचा
त्याअनुषंगाने महापालिकेने ऑक्टोबर महिन्याचा अहवाल सादर केला असून त्यात पाणी स्वच्छ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा स्वच्छ असल्याची ठाम भूमिका विभागाने मांडली आहे. मात्र नोव्हेंबर महिन्याचा अहवाल अद्याप कारागृह प्रशासनाला सादर करण्यात आलेला नाही. त्यापूर्वी कारागृहातील जलव्यवस्थापन यंत्रणा तपासली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.
-------------------