नाशिक महापालिकेत नोकरीचे आमिष
चौघांना ७५ हजारांचा गंडा; गंगापूर पोलिसांत गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : महापालिकेत संगणक परिचालक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रशिक्षणाच्या नावाखाली चौघांची सुमारे ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अतुल बस्ते याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तेजस्विनी बागूल यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयित बस्ते याने तक्रारदारांसह नीलेश शिंदे आणि मानसी सोनवणे यांच्याकडून प्रत्येकी २० हजार रुपये, तर पूजा पगार यांच्याकडून १५ हजार रुपये घेतले.
शुक्रवार (ता. १३) ते गुरुवार (ता. १८) या कालावधीत गंगापूर रोड परिसरात स्वयंसेवक प्रशिक्षणाच्या बहाण्याने चौघांना बोलावण्यात आले. यावेळी संशयिताने मोबाईलवर महापालिकेतील संगणक परिचालक पदाचे नियुक्तिपत्र तयार करून दाखविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मात्र, संबंधित प्रशिक्षण मोफत असल्याचे समजल्यानंतर पीडितांनी भरलेल्या पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयिताने उडवाउडवीची उत्तरे देत रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गंगापूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक अहिरराव तपास करीत आहेत.