सेकंड मेन
फोटो : H35277, H35280, H35281, H35285, H35287,
नाशिक : शहरातील जॉगिंग ट्रॅकच्या देखभालीचा अभाव स्पष्ट होत आहे. कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवरील तुटलेले प्रवेशद्वार, कचरापेट्यांची दुरवस्था, अस्वच्छता तर गोल्फ क्लब मैदानावरील खेळण्यांची मोडतोड, बंद पिण्याच्या पाण्याची सुविधा व सुरू असलेले स्वच्छतागृहाचे काम.
--
आरोग्य नव्हे, अनारोग्याचा ट्रॅक
शहरातील उद्याने, क्रीडांगणे अन् जॉगिंग ट्रॅक समस्यांच्या विळख्यात
नाशिक, ता. १८ : हिवाळ्याची चाहूल लागल्याने शुद्ध हवा आणि तंदुरुस्तीसाठी शहराच्या विविध भागांतून उद्याने व जॉगिंग ट्रॅकवर गर्दी करणाऱ्या नागरिक आणि व्यायामप्रेमींचा हिरमोड होत आहे. एकीकडे थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या अनास्थेमुळे पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगर, जुने नाशिक आणि वासननगर परिसरातील उद्याने व क्रीडांगणांची दयनीय अवस्था झाली आहे.
कचऱ्याचे ढीग, वाढलेले गाजरगवत, तुटलेली ‘ग्रीन जिम’ची साधने, उघड्या नाल्यांची दुर्गंधी आणि अपुऱ्या सुविधांमुळे आरोग्यासाठी पडणारे हे पाऊल अक्षरशः ‘अनारोग्याकडे’ नेणारे ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लाखो नागरिक त्रस्त असून, या हक्काच्या विरंगुळा व व्यायाम केंद्रांची तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. कोटी रुपये खर्चून उभारलेली ‘ग्रीन जिम’ची साहित्ये कुठे गंजून भंगारात निघाली आहेत, तर कुठे चक्क चोरीला गेली आहेत. जुने नाशिकसारख्या दाटीवाटीच्या भागात सुरक्षेअभावी उद्यानांत नशेखोरांचा वावर वाढल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी पाठ फिरवली आहे. इंदिरानगर आणि वासननगरमध्ये उखडलेले जॉगिंग ट्रॅक, धुळीचे लोट आणि उघड्या नाल्यांच्या दुर्गंधीमुळे व्यायाम करणाऱ्यांना उलट श्वसनाचे व गुडघेदुखीचे विकार जडत आहेत. एकीकडे महापालिका नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल करते, तर दुसरीकडे कोट्यवधींचा निधी खर्च करूनही उद्यानांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. आगामी काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष मैदानात उतरून शहराच्या या ‘ऑक्सिजन हब’ना पुन्हा संजीवनी द्यावी, अशी संतप्त भावना नाशिककरांमधून व्यक्त होत आहे. (सविस्तर वृत्त पान ३ वर)