पान तीन ॲंकर
----------------
३३०२३
----------
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जंक्शनचा विकास
आराखड्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्थेची लवकरच नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख जंक्शनचा शास्त्रीय पद्धतीने विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जंक्शन सुधार आराखडा तयार केला जात आहे. आराखड्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागार संस्थेमार्फत शहरातील महत्त्वाच्या चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
पुढील दहा वर्षांतील वाहतूक वाढ आणि वाहनसंख्येचा अंदाज घेऊन इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार जंक्शनचे आरेखन केले जाणार आहे. या आराखड्यात रोड सेफ्टी ऑडिटचाही समावेश असणार आहे. शहराची लोकसंख्या आणि वाहनसंख्या झपाट्याने वाढत असताना आहे त्या जंक्शनची रचना अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याबरोबरच अपघातप्रवण क्षेत्रे निर्माण झाली आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने हा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून वाहतूक केवळ सुरळीतच नव्हे तर सुरक्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. पादचारी आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार असून, सिग्नल यंत्रणा आणि पार्किंग व्यवस्था अधिक सुलभ केली जाणार आहे.
सल्लागार संस्थेकडून प्रत्येक जंक्शनच्या वाहतूक नकाशाचे मायक्रो सिम्युलेशन केले जाणार आहे. आराखडा तयार करताना पादचाऱ्यांसाठीचे पदपथ, सिग्नल यंत्रणा, बस थांब्याचे नियोजन, पावसाळी पाण्याचा निचरा, पथदिवे आणि सायकल मार्ग या मूलभूत सुविधांचा विचार केला जाईल. त्याचबरोबर सीसीटीव्ही, सेन्सर आणि काउंटडाऊन टायमर यासारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून वाहनांचे प्रकार आणि शहराची घनता लक्षात घेऊन जंक्शनचा डिझाईन वेग निश्चित केला जाईल. वाहतूक प्रवाह सुरक्षित करण्यासाठी दुभाजक, ट्रॅफिक आयलंड आणि चॅनेलायझेशन केले जाणार आहे. जंक्शन शक्यतो सिग्नलमुक्त ठेवणे आणि डावीकडे वळणाऱ्या वाहनांना मोकळी वाट देणे यावर विशेष भर असेल. वाहतुकीच्या संख्येनुसार बदलणारी ॲडॅप्टिव्ह सिग्नल प्रणाली बसवली जाणार असून, पादचाऱ्यांसाठी क्रॉसवॉक आणि रिफ्युज आयलंड तयार केले जातील.
-----------------
महापालिका, पोलिसांचे समन्वय पथक
सार्वजनिक वाहतुकीच्या समन्वयासाठी सायकल ट्रॅक आणि पदपथाचे एकात्मिक नियोजन केले जाईल. अंतिम आराखड्याला मंजुरी देण्यापूर्वी बॅरिकेड्स आणि तात्पुरत्या चिन्हांकनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि मनपा अधिकारी समन्वयाने काम करणार आहेत. जंक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी वाहतुकीचे पुन्हा मूल्यमापन करून त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे.