Nashik Kala Katta | कलेची उपासना म्हणजे ध्यानमग्नेतील योगसाधनाच : वेणूनादाचे उपासक मोहन उपासनी

Mohan Upasani
Mohan Upasaniesakal

वायू, वादळ बनून विश्वाचा लय करणारे हे पंचमहातत्त्व जेव्हा मानवाच्या ओठातून सूक्ष्म रूपाने बांबूत फुंकर बनून प्रवेश करते, त्या वेळी जन्म घेतो ‘वेणूनाद’. असाच एक वेणूनाद नाशिकच्या मुरलीधर मंदिरात २००३ ला जन्माला आला.

मोहन उपासनी यांची बासरी देवापुढे निनादली आणि मूर्तीतल्या मुरलीधराने प्रसाद म्हणून नाव सुचविले ‘वेणूनाद’. आजवर हजारो मैफिलीतून बासरीचा वेणूनाद गाजविणारे मोहनजी ‘सकाळ’ च्या वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, बासरी या वाद्याच्या कलेची उपासना म्हणजे ध्यानमग्न अवस्थेत नेणारी योगसाधनाच आहे.

बासरीत फुंकर मारताना मूलाधार चक्राला गती मिळून तिच्या सहा छिद्रातून काम- क्रोधदी षडरीपू बाहेर पडतात आणि मनाची शुद्धी होते, कारण बासरीला मीपणा नाही, त्यामुळे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांच्या पलीकडे नेणारे हे वाद्य आहे. - तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta worship of art like yoga in meditation Mohan Upasani worshiper of Venunada nashik news)

बासरी उलगडून सांगता, सांगता मोहनजी सहजच गाऊ लागतात आणि त्यांच्यातला संगीतकार जागा होऊन बोलू लागतो. मी गळ्यातून गात नसेल पण माझे गाणे बेंबीच्या देठापासून आहे. त्यामुळे समोरच्याचा गळा गाऊ लागतो, तेव्हा जणू मीच गात असतो अशी माझी भावना आहे.

गायनावरच्या या प्रेमामुळे आजवर त्यांनी शेकडो कवितांना चाली लावून कवितेला ‘गीता’ पर्यंतचा प्रवास घडविला आहे. त्यांच्या संगीत रचनांचेही स्वतंत्र कार्यक्रम सादर होतात. बासरीचा आणि गळ्याचा फार जवळचा संबंध आहे, हे त्यांना जाणवते.

गायनाचा हातात हात घेऊन रंगत भरणाऱ्या त्यांच्या या अनोख्या वादनाला मुंबईच्या पारशी जिमखान्यातील पहिल्याच कार्यक्रमात नाना पाटेकर, अरुण दाते अशा अनेक दिग्गजांनी थांबून दाद दिली आणि पाहता पाहता ‘वेणूनाद’च्या यशाची घोडदौड, ३००० कार्यक्रमांपर्यंत जाऊन पोचली.

बासरी या वाद्याला मैफलीचा दर्जा मिळवून देण्यात त्यांना खऱ्या अर्थाने यश आले. नाशिकचे श्रेष्ठ गुरू पं. प्रभाकर दसककर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचा पाया गिरविल्यामुळे त्यांना तंत्र व कला यांचा मेळ उमगला आहे.

यामुळे चित्रपट संगीत वाजवीत असताना त्यांना त्यातील सौंदर्यस्थळे सहज शोधता येतात. प्रत्येक प्रकारचे संगीत बासरीवर वाजवणे हे त्यांच्यासाठी एक वेगळे आव्हान असते, परंतु त्यात आनंदाने रममाण होत ते या आव्हानाच्या पलीकडे जाऊन आनंदाची देवघेव करीत असतात.

Mohan Upasani
Kala Katta : मोबाईलच्या मायावी कैदेतून पडा बाहेर; पॉटरी कलेच्या प्रसारासाठी सोनाली पाटील यांचे समर्पण

बहुतेक भारतीय स्वरवाद्यांचे वेगळेपण असे, की ती वाजवता येण्यासाठी प्रचंड रियाजाची आवश्यकता असते. बासरीसारख्या वाद्यावर तर कोणता स्वर कोठे आहे, हे डोळ्यांनी पाहताही येत नाही आणि तरीही वादनात स्वरांचा नेमकेपणा येण्यासाठी त्या वाद्यावर जी हुकमत लागते, त्यासाठी वादकाच्या बोटांनाच डोळे यावे लागतात.

विद्यार्थ्यांकडून बासरीची बाराखडी गिरवून घेताना मोहनजी त्यांना या नजरेतून रियाजाची सवय लावतात. आजकालचे विद्यार्थी घरी गृहपाठ करायला विसरतात. त्यामुळे घरचा अभ्यास ते क्लासमध्ये येऊन करतात.

अशाने विद्या पुढे कशी सरकणार, अशीही खंत मोहनजी व्यक्त करतात. कोरोनाकाळात बासरी वादन क्षेत्राचे नुकसान झाले असले तरी त्यातून अनेक गुणीजनांच्या वादनशैलीचा परिचय झाला व शिकायलाही खूप मिळाले, परंतु शेवटी प्रत्यक्ष समोर बसून बासरी ऐकविण्यात खरे समाधान आहे कारण कलाकार हा शेवटी समाधानावरच जगत असतो असेही ते म्हणतात.

उद्याचे भविष्य उज्ज्वल

कृष्णरूपसज्जेत चौथ्या वर्षी आईने छोट्या मोहनच्या हातात दिलेली बासरी ही केवळ शोभेची वस्तू न राहता निनादू लागली ती आजतागायत. बासरी वादनाच्या या कलाक्षेत्रात सगळेच कलाकार मनापासून काम करतात, कष्ट करतात. त्यामुळे आज बासरी

शिकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. संगीत क्षेत्रातली ही संधीही आहे आणि जबाबदारीदेखील. शिष्याने माझ्याकडे शिकून पुढे आणखी मोठ्या गुरूकडे शिकावे असा मनाचा मोठेपणा असलेले मोहन उपासनींसारखे कलाकार नाशिकला लाभले आहेत, त्यामुळे बासरी वादनाचे उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे.

Mohan Upasani
Nashik Kala Katta | कलाकारांचा कलेशी व वाचकांशी विचारसंवाद; कलात्मक तबला रुजविणारे नादसाधक : नितीन वारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com