फोटो :H33506
चंद्राच्या साक्षीने रंगला काव्य मेळावा
नाशिक कवीतर्फे आयाेजन ; ६५ कवींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ : चंद्र तारे तुला तर नको पाहिजे, मागते कोणता ग्रहगोल तो..., सांभाळून घ्या, बाबा आता माहेराचे वाण नको.. उपकारांनी तुमच्या झुकले सोन्याची ती खाण नको..! यासारख्या एकसे एक कवितांनी कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चंद्राच्या साक्षीने ‘काव्य मेळावा’ उत्साहात पार पडला. अरुण सोनवणे यांच्या गाजलेल्या कवितेला उपस्थितांची दाद मिळाली तर, तेजस्विनी कदम यांची गझल सगळ्यांना अंतर्मुख करून गेली.
नाशिक कवी संस्था आयोजित कार्यक्रम शनिवारी (ता. २४) भावबंधन मंगल कार्यालयात पार पडला. गेल्या २३ वर्षापासून सातत्याने काव्य कोजागिरी अर्थात काव्य मेळावा घेण्यात येतो. अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष सुभाष सबनीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा गंगाधर अहिरे होते. ते म्हणाले, साहित्य प्रकारातील कविता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. नाशिक जिल्हा हा परिवर्तनवादी चळवळीचा जिल्हा आहे. येथील कवींनी जिल्ह्याला समृद्ध केले असून आपल्या सर्व कवींना या जुन्या जाणत्या कवींचा अभिमान असायला हवा. कविता लिहिताना कवितेकडे सजग दृष्टीने पाहिले पाहिजे. कविता कवितेशी प्रामाणिक असायला हवी. कविता लिहिणाऱ्याला ती आवडायला हवी तरच ती दुसऱ्याला आवडेल.. याप्रसंगी पद्माकर देशपांडे, सुनील गायधनी, डॉ. लक्ष्मीकांत भट, माणिकराव गोडसे, संजय आहेर, तुकाराम ढिकले यांच्यासह मेळाव्यात ६५ कवींना सहभाग घेतला. यावेळी कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, गिरणा गौरवचे सुरेश पवार, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, नरेंद्र पाटील उपस्थित होते. भारती देव यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष अजिंक्य मगर यांनी आभार मानले. दुग्धपानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
-----