
ओझर : भारतात अफगाणिस्तानमधून बी असलेले द्राक्ष व बेदाण्यास मोठी मागणी वाढत आहे. मात्र त्यास सुगंध नाही; परंतु भारताच्या कृषी क्षेत्रातही दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. आगरकर इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने सुगंध (आरोमा) असलेला एच-५१६ ही बी असलेली काळ्या रंगाची व्हरायटी तयार करून महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या तळेगाव (ता. दिंडोरी) येथील फार्मवर तीन वर्षांपूर्वी ट्रायल प्लांट म्हणून २० आर क्षेत्रावर यशस्वी लागवड केली. त्यामुळे आता भारतीयांना अफगाणिस्तानपेक्षा उच्चप्रतीचे बी असलेले सुगंधी काळे बेदाण्याची चव चाखायला मिळणार आहे.