सेकंड मेन
फोटो : H34235, H34236, H34237
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर रविवारी रामतीर्थ परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी होती.
--
चोवीस तासानंतरही सोहळ्याचा दरवळ कायम
दुसऱ्या दिवशीही रामतीर्थावर गर्दी; अनेकांनी केले गोदास्नान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगल पर्वाचा शनिवारी (ता. ३१) झालेला प्रारंभ, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, गोदातीरावर घुमणारे मंत्रांचे स्वर आणि हजारों दिव्यांनी उजळलेला घाट हे चित्र चोवीस तासांनंतरही नाशिककर भाविकांच्या मनात कायम आहे. रविवारी (ता. १) दिवसभर गोदाघाटावर भाविकांची गर्दी कायम होती. अनेकांनी यावेळी गोदास्नानाचा आनंद घेतला. पुरोहित संघाच्या तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाच्या समारोपाला अनेकांनी हजेरी लावली.
गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करून पुण्यसंचयाची भावना व्यक्त करत अनेक भाविकांनी कुंभपर्वाच्या या मंगलक्षणांचा अनुभव घेतला.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला प्रारंभ झाल्यानंतर गोदावरीच्या रामतीर्थावर भाविकांची वर्दळ वाढली आहे. रविवारी सकाळपासूनच भाविकांनी रामतीर्थावर दर्शन आणि धार्मिक विधींसाठी गर्दी केली होती. गोदावरीच्या पवित्र जलात स्नान करून भाविकांनी देवदर्शन घेतले. अनेकांनी तीर्थश्राद्ध, पितृतर्पण, संकल्पपूजन, अभिषेक आदी धार्मिक विधी केले. पुरोहितांच्या मंत्रोच्चारांनी परिसरातील वातावरण अधिकच मंगलमय झाले होते. रामकुंड परिसरात ठिकठिकाणी धार्मिक विधी सुरू असल्याचे चित्र दिसत होते. कुटुंबीयांसह आलेल्या भाविकांनी गोदावरीचे पूजन करून सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने पुण्यसंचय केला. घाट परिसरात भाविकांची सतत ये-जा सुरू होती. मंदिरांमधील दर्शन, गोदापूजन आणि धार्मिक विधींमुळे रामतीर्थ परिसराला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
--चौकट
धार्मिक परंपरेची अनुभूती
सिंहस्थाच्या प्रारंभानंतर गोदातीरावर निर्माण झालेला हा भक्तिभावाचा माहोल नाशिकच्या धार्मिक परंपरेची अनुभूती देणारा ठरला.
पुरोहितांच्या मुखातून घुमणारे वेदमंत्र, श्रद्धेने जोडलेले हात आणि गोदामाईच्या चरणी नतमस्तक होणारे भाविक, अशा भक्तिमय वातावरणाने गोदातीर भारावून गेला. सिंहस्थाच्या आगमनाने नाशिकच्या धार्मिक परंपरेला पुन्हा एकदा चैतन्य प्राप्त झाले आहे.