पान चार मेन
कुंभमेळा लोगो वापरणे
---------
-----------------
पुरोहित संघाच्यावतीने तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम
नाशिक ग्राम परिक्रमा; साधू-संत, आखाडे, चित्ररथांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१३ : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या सिंहस्थ महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहणानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या सिंहस्थ समितीतर्फे ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान रामतीर्थ, पंचवटी येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तीनला मोदी ग्राउंड येथून धर्मध्वजासह भव्य ग्रामपरिक्रमा काढण्यात येणार आहे.
ग्रामपरिक्रमेचा प्रारंभ दीपप्रज्वलन, श्रीफळ अर्पण, तीर्थपुरोहितांचे मंत्रोच्चार, शंखनाद आणि गणेश वंदनेने होणार आहे. नाणीजधाम येथील रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे श्रीमहंत, महामंडलेश्वर, साधू-संत आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. धर्मध्वज, कुंभस्थ, साधू-संतांचे रथ, विविध संस्थांचे चित्ररथ, ढोलपथके, शंखनाद पथके, शौर्यपथकांची प्रात्यक्षिके आणि आदिवासी बांधवांची पारंपरिक नृत्ये हे परिक्रमेचे आकर्षण असेल.
३० ऑक्टोबर रोजी वल्लभाचार्य महाराजांच्या यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाची सुरूवात होईल. यात प्रायश्चित्त संकल्प, तीर्थपूजन, गणेशपूजन, नवग्रह व रूद्र स्थापना, स्नपन विधान हवन आणि गोदावरी प्रार्थना असे धार्मिक विधी होतील. शनिवारी ३१ ऑक्टोबरला सकाळी देवतापूजन, संकल्प, गणेशपूजन आणि तीर्थपूजन होईल. दुपारी बाराला नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महाध्वजारोहण आणि गोदाआरती प्रार्थना होणार आहे. तर १ नोव्हेंबरला शृंगेरी मठाचे शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तरांग हवन, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती आणि कर्मसमर्पणाने सोहळ्याची सांगता होईल.
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त तथा सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल, संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि पदाधिकारी या सोहळ्याच्या आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेचे सहकार्य लाभत असून या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
असा असेल परिक्रमेचा मार्ग
मोदी मैदान, तपोवन, सावरकर पथ, धुमाळ पॉइंट, मेनरोड, पंचमुखी हनुमान, गणेशवाडी, रविवार कारंजा, गाडगे महाराज पूल, नेहरू चौक, वीर अहिल्याबाई होळकर पूल आणि मालेगाव स्टँडमार्गे ग्रामपरिक्रमा रामतीर्थावर पोहोचेल. तेथे गोदावरी महाआरतीने परिक्रमेची सांगता होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, बीएपीएस स्वामीनारायण संस्था, चिन्मय मिशन, स्वामी समर्थ केंद्र, इस्कॉन, गौडीय मठ, ब्रह्मकुमारी यांच्यासह विविध धार्मिक व सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. मार्गावर स्वागत, पिण्याचे पाणी आणि सरबत वाटपाची व्यवस्था करण्यात येणार आहे.