ध्वजारोहण लेख
--------------
--------------
नाशिकची समृद्धी अन् वैभवाचा शंखनाद
लीड
सिंहस्थ कुंभमेळा श्रद्धेचा आणि अध्यात्माचा सोहळा आहे. कुंभमेळ्यासाठी केवळ देशातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक श्रद्धेने नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये येतात. कुंभपर्वात गोदावरीतील पवित्र स्नानाला महत्त्व असते. देशभरातील भाविक या सोहळ्यासाठी श्रद्धेने येतात. त्यांना पावित्र्य आणि आनंदाची अनुभूती यावी, यासाठी पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे सांस्कृतिक आणि आधुनिक रूप जगभरात जाईल. नाशिकची उद्योग, पर्यटन, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील क्षमता जगासमोर ठेवण्यासाठी आणि आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याने हा सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. प्रवीण गेडाम,
अध्यक्ष, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण
तथा
विभागीय आयुक्त, नाशिक
----------------------
ना शिक- त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑगस्ट- सप्टेंबर २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे अमृतस्नान होणार आहे. कुंभमेळ्याच्या प्रभावी नियोजनासाठी शासनाने या वेळी प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची स्थापना केली. केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी कायमस्वरूपी विकासकामे करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे नाशिक परिसराच्या सौंदर्यीकरणाबरोबर सर्वोत्तम पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे नाशिक शहर आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न होण्यास मदत होईल. त्याचा लाभ प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीत होणार आहे. तसेच, येथील उद्योग, सेवा पुरवठादार, लहान व्यावसायिक आदींसाठी होईल. अर्थकारणालाही चालना देण्याबरोबर शेजारील जिल्ह्यातील पर्यटनालाही या सोहळ्यामुळे चालना मिळणार आहे. कुंभमेळ्याची कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विकासकामे करताना पारदर्शकता आणि कामाच्या गुणवत्तेबाबत प्राधिकरणाने विशेष दक्षता बाळगली. नवतंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सोहळ्यातील नियोजन आणि भाविकांची सुरक्षितता निश्चित करण्यावर अधिक भर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्त्व जगभरात पोहोचविण्यासाठी विविध विकासकामे सुरू आहेत. गोदावरी नदीच्या काठावर संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार, तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. रामतीर्थ, सीतागुंफा, काळाराम मंदिर, राम-लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल. देशभरातून गोदातटी श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना आनंददायी अनुभव येथे घेता येईल. त्र्यंबकेश्वर येथे दर्शन पथ साकारण्यात येणार असून, त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होईल.
---------------
पायाभूत सुविधांचा विकास
ओझर येथील नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, रेल्वे सेवेचे बळकटीकरण, नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथे अंडरपास, घोटी- पेगलवाडी रस्ता, जव्हार- मनोर- पालघर आदी रस्त्यांचा विकास, नाशिक वर्तुळाकार मार्ग आदी कामे नाशिक- त्र्यंबकेश्वर आणि परिसराच्या विकासाला चालना देणारी ठरतील. पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे घाटांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
---------------------------
हरित व पर्यावरणपूरक कुंभ
गोदावरी नदीचे पावित्र्य जपले जावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या कुंभमेळ्यात ‘गोदावरी’च्या निर्मल जलामुळे या पावनपर्वाचे माहात्म्य आणखी वाढेल. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडात पाणी निर्मळ राहण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर पालिका आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून विविध मलनि:स्सारण प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या कुंभमेळ्याप्रमाणे हा सोहळाही हरित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठीचे नियोजन सुरू आहे.
------------------------------
भाविकांच्या सुरक्षेला महत्त्व
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेला महत्त्व देण्यात येत असून, त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोगही करण्यात येईल. जागेची मर्यादा लक्षात घेऊन वाहनतळ, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शेजारच्या जिल्ह्यातील धार्मिकस्थळांचे पर्यटन आदींबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यंदाचा नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा सुरक्षित, पर्यावरणपूरक, भव्य आणि स्मरणीय व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
-----------------------
नाशिकला जागतिक स्तरावर नेण्याची संधी
नाशिक ही मंत्रभूमी, तंत्रभूमी व यंत्रभूमी आहे. ही हिरवा शालू नेसलेली कृषी भूमी आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणारी भूमी आहे. इथला ऐतिहासिक- सांस्कृतिक वारसा आणि औद्योगिक प्रगतीच्या सुंदर समन्वयाने नाशिकला एक नवी ओळख दिली. येणारा कुंभमेळा अशी ओळख जागतिक स्तरावर नेण्याची सुवर्णसंधी आहे. कुंभ ध्वजारोहणानिमित्त नाशिकचा सांस्कृतिक गौरव आणि क्षमता जगासमोर ठेवण्याची संधी आहे. येथील सांस्कृतिक वारशाचे नवे झळकणारे सांस्कृतिक रूप जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे असेल. नाशिकच्या ब्रँडिंगसाठी ही सुयोग्य पर्वणी आहे. त्यामुळे हा ध्वजारोहण सोहळा नाशिककरांसाठी दीपपर्वाची सुंदर सुरुवात असण्याकरिता नाशिकच्या वैभवाचा आणि विकासाचा शंखनाद ठरेल, यात शंका नाही.
-------------------------