पान एक (उभी दोन कॉलमात बसविणे, शक्य असल्यास)
----------------
सिंहस्थ लोगो व ध्वज घेणे
-------------------
समुद्रमंथनाचा वारसा, ५१ फुटांचा धर्मध्वज!
ध्वजावर सिंह, चंद्र, सूर्य, अमृतकुंभ, ओम, स्वस्तिक, श्री ही चिन्हे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१३ : गोदावरीच्या तीरावर भरणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा प्रारंभ ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार आहे. यंदा ध्वजपरंपरेला आधुनिक स्थापत्याची जोड देण्यात आली आहे. रामतीर्थवर ५१ फुटांचा, तर त्र्यंबकेश्वर आणि नवीन गोदावरी घाट परिसरात ३१ फुटांचे ध्वजस्तंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ध्वजस्तंभांवर समुद्रमंथनाशी संबंधित पौराणिक प्रसंगांचे प्रतीकात्मक कोरीवकाम करण्याची संकल्पना पुढे आली आहे. मात्र, ध्वजस्तंभाची रचना, त्यावरील शिल्पे आणि प्रत्यक्ष फडकवली जाणारी धर्मपताका या स्वतंत्र बाबी आहेत. पताकांची रचना संबंधित पुरोहित संघांकडून निश्चित केली जाणार असल्याने यंदाच्या सिंहस्थात धार्मिक परंपरा आणि आधुनिक स्थापत्य यांचा संगम पाहायला मिळणार आहे. ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहण होत आहे.
प्रस्तावित आराखड्यानुसार रामकुंडावरील ध्वजस्तंभ ५१ फूट, तर त्र्यंबकेश्वरमधील ध्वजस्तंभ ३१ फूट उंचीचा असेल. पायाभरणीच्या त्रिज्येबाबत अनुक्रमे एक फूट आणि आठ इंच असे मोजमाप नमूद करण्यात आले होते. पायाभरणी मजबूत आणि टिकाऊ ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. ध्वजस्तंभाचा पाया साधा, तर सजावटीचे आणि प्रतीकात्मक काम वरच्या भागात करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी ध्वजस्तंभांच्या रचनेत सुसंगती ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
---
यंदाच्या ध्वजाची प्रतीक्षा
२०२७ च्या सिंहस्थासाठी ध्वजस्तंभांच्या स्थापत्यरचनेत समुद्रमंथनाशी संबंधित प्रतीकात्मकतेचा समावेश करण्याचे नियोजन हे यंदाच्या तयारीतील वैशिष्ट्य़ आहे. त्याचबरोबर पताकांची रचना पुरोहित संघांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्याचे ठरल्याने धार्मिक परंपरेला स्वतंत्र स्थान देण्यात आले आहे. याचवेळी सिंहस्थ महाध्वजाची स्थापना होते. हा ध्वज भगव्या रंगाचा असून हा रंग त्यागाचे प्रतीक आहे. बृहस्पतीचा आकार हा आयताकृती असल्याने ध्वज त्याच आकाराचा आहे. बृहस्पतीचे वाहन सिंह असल्याने ध्वजावर सिंह आहे, ते शूरत्वाचे प्रतीक आहे. देव देश आणि धर्माचे रक्षण सिंहाप्रमाणे करू हा संदेश त्यातून देण्याचा प्रयत्न आहे. ध्वजावर चंद्र-सूर्य आहेत. तर त्यावरील अमृतकुंभ अमरत्वाचे, मुक्तीचे आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे. स्वस्तिक, ओम, श्री ही चिन्हे ध्वजावर आहेत. रेशमी कापडाच्या या ध्वजाला १२ गोंडे, घुंगरू आणि घंटी आहे.
---
ध्वजारोहण म्हणजे कुंभपर्वाचा संकेत
नाशिकमधील सिंहस्थाचा ज्योतिषीय आधार गुरूचा सिंह राशीतील प्रवेश हा आहे. गुरूच्या सिंह राशीतील स्थितीशी संबंधित पर्वकाल आणि गोदावरीतील पवित्र स्नान यांमुळे या कुंभपर्वाला ‘सिंहस्थ’ हे नाव प्राप्त झाले आहे. त्यामुळे ध्वजारोहणाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
---
ध्वजस्तंभ, धर्मध्वजा, बोधचिन्हातील फरक
ध्वजस्तंभ : धर्मपताका उभारण्यासाठी तयार करण्यात येणारी संरचना. तिची उंची, पायाभरणी, बांधकाम साहित्य आणि कोरीवकाम यांचा यात समावेश होतो.
धर्मध्वजा किंवा पताका : ध्वजस्तंभावर फडकवली जाणारी धार्मिक पताका. तिचा रंग, आकार, कापड, त्यावरील चिन्हे आणि धार्मिक विधी यांचा तपशील संबंधित पुरोहित संघांच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात येणार आहे.
सिंहस्थाचे बोधचिन्ह : कुंभमेळ्याची ओळख दर्शवण्यासाठी वापरले जाणारे अधिकृत दृश्यचिन्ह किंवा लोगो.
---
विश्वाच्या शांतीकरीता, विश्वबंधुत्व जागृतीसाठी संपन्न होणारा वैश्विक धर्मोत्सव म्हणजेच सिंहस्थ कुंभपर्व आणि ध्वजा ही सिंहस्थाची प्रतिकात्मक ओळख आहे.
- शौचे गुरूजी, यज्ञविद्या वाचस्पती