ध्वजारोहण पुरवणी लेख
-----------------------------------
सिंहस्थ कुंभमेळा : नाशिकच्या सर्वांगीण विकासाचे ऐतिहासिक पर्व
लीड
गोदावरी नदीतीरावर होणारा आध्यात्मिक महासंगम नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे भारतीय संस्कृतीच्या विराट स्वरूपाचे दर्शन घडविणारे पर्व. सिंहस्थ नाशिकसाठी धार्मिक सोहळा तर आहेच. शिवाय, नाशिकच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण, डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पर्यावरण संवर्धन, गोदावरी स्वच्छता, धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार देणारे हे नवे विकासपर्व ठरेल.
- गिरीश महाजन,
कुंभमेळा व जलसंपदा- आपत्ती व्यवस्थापनमंत्री,
महाराष्ट्र राज्य
---------------
नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा इतर राज्यांतील कुंभांप्रमाणेच महत्त्वाचा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही कुंभमेळ्याकडे लक्ष ठेवून आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा राज्य शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर समिती, कुंभमेळामंत्री समितीच्या माध्यमातून नियंत्रण केले जात आहे. त्याचा परिपाक म्हणून सर्व विभागांच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळाली. ता. ३१ ऑक्टोबरपासून कुंभमेळा पर्वाला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. कुंभमेळ्याचा एकूण कालावधी २० महिने तीन आठवडे म्हणजे ६३२ दिवस असून, मुख्य कार्यक्रम १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ या कालावधीत असतील. म्हणूनच प्रशासन, व्यवस्थापनात्मक आणि आपत्ती व्यवस्थापन क्षमतेची जागतिक पातळीवर परीक्षा घेणारा आहे. सिंहस्थासाठी १० ते १२ कोटी भाविक भेट देण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्यात नाशिकमध्ये ४४, तर त्र्यंबकेश्वरमध्ये ३५ पर्वणीस्नान, तर तीन अमृतस्नान होतील. भाविकांची प्रचंड गर्दी एकाच वेळी धार्मिक केंद्रांवर होईल. भाविकांची सुरक्षितता, शिस्तबद्ध आणि आनंददायी व्यवस्था करणे हे देशातील सर्वांत मोठ्या व्यवस्थापन उपक्रमांपैकी एक ठरणार आहे. यामुळे सिंहस्थाच्या तयारीकडे केवळ तात्पुरती व्यवस्था म्हणून पाहिले जात नाही. नाशिकच्या पुढील २५ ते ३० वर्षांच्या विकासाचा विचार करून पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. सिंहस्थासाठी ३७३ हून अधिक विकासकामे सुरू असून, त्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ही गुंतवणूक सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासासाठी उपयोगी पडेल. विकासकामे नाशिकच्या दीर्घकालीन विकासासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरतील.
--
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ३५ हजार कोटींची कामे सुरू असताना कुंभमेळ्याच्या माध्यमातूनही ३५ हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. विविध व्यवसायांना याचा लाभ होईल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील. १३ आखाड्यांच्या साधुग्रामसाठी तपोवन व परिसरात सुमारे एक हजार ४६८ एकर, त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६८८ एकर क्षेत्रात साधुग्राम उभारले जात आहे. साधुग्राममध्ये निवास, स्वच्छता, पाणी, वीज, आरोग्य, सुरक्षा पुरविली जात आहे. पार्किंगच्या नियोजनाचा भाग म्हणून नाशिकमध्ये १६ ठिकाणी तीन लाख ३२ हजार १३४ ईसीएस, तर त्र्यंबकेश्वरमध्ये १४ ठिकाणी दोन लाख ४९ हजार ९४० ईसीएस इतकी पार्किंग क्षमता विकसित करण्याचे नियोजन आहे. कुंभमेळ्यात सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा भाग म्हणून सुमारे चार हजार ५०० एसटी बस उपलब्ध ठेवण्याची तयारी आहे. रेल्वेमार्गाने प्रतिदिन सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता विकसित केली जाईल. रस्तेमार्गाने आठ लाख भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. पार्किंगच्या ठिकाणापासून धार्मिक स्थळांपर्यंत विशेष वाहतूक व्यवस्था असेल.
----------------
श्रद्धेला तंत्रज्ञानाची जोड
सिंहस्थाकडे ‘डिजिटल कुंभ’ म्हणून पाहिले जात आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा, मार्गदर्शन, आपत्कालीन प्रतिसाद यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सीसीटीव्ही, सुमारे ३७८ किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि तीन अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेद्वारे गर्दीचे रिअल टाइम विश्लेषण, ड्रोन सर्व्हेलन्स, फेस रिकग्निशन, जीआयएस-जीपीएस प्रणाली आणि रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंगचा वापर केला जाईल. मोबाईल ॲपच्या माध्यमातून भाविकांना गर्दीची स्थिती, पार्किंगची उपलब्धता, वाहतूक मार्ग, आरोग्यसेवेची माहिती मिळेल. ‘एआय’च्या मदतीने गर्दीचा अंदाज, क्यूआर आधारित सेवा, डिजिटल हेल्पलाइन, स्टार्टअपच्या माध्यमातून ‘कुंभथॉन’सारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
--------------------
स्वच्छता आणि आरोग्य
घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे आठ हजार ५०० मनुष्यबळाचे नियोजन आहे. ६१ हजार ५०० तात्पुरती स्वच्छतागृहे, ३४ हजार स्नानगृहे आणि १६ हजार ५०० कचरापेट्या उपलब्ध केल्या जातील. कचरा संकलनासाठी अतिरिक्त वाहने असतील. भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच वैद्यकीय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. साधुग्राम, पार्किंग, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, तसेच प्रमुख मार्गांच्या परिसरात १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारल्या जातील. पर्वणी काळात १९० रुग्णवाहिका राहतील. वैद्यकीय व आरोग्य व्यवस्थेसाठी तीन हजार ६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध असेल.
-----------------------------
प्रदूषणमुक्त ‘गोदावरी’ला प्राधान्य
गोदावरी नदी स्वच्छता व संवर्धन सिंहस्थाच्या नियोजनातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण होऊ नये, सांडपाणी नदीत मिसळू नये आणि घाट परिसरात स्वच्छता कायम राहावी, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी सांडपाणी प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्त कुंभ, घाट परिसराची स्वच्छता आणि नदीच्या पर्यावरणाचे संरक्षण या सर्व बाबींवर विशेष भर आहे. पर्यावरणपूरक सिंहस्थासाठी उन्नत अभियानांतर्गत ‘हरित कुंभ, हरित मॉन्सून’ हा उपक्रम राबविला जाईल. नाशिकमध्ये सुमारे ५० हजार वृक्षांच्या लागवडीचा आणि वाटपाचा टप्पा पूर्ण झाला. वृक्षारोपणाबरोबरच संगोपन महत्त्वाचे आहे.
---------------------
धार्मिक पर्यटनाला नवी दिशा
नाशिक, पंचवटी, रामतीर्थ, त्र्यंबकेश्वर, कुशावर्त आणि परिसरातील विविध धार्मिक स्थळांना भाविकांकडून भेटी दिल्या जातात. यासाठी ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ या विशेष पर्यटन बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. पायाभूत सुविधा पुढील अनेक वर्षांसाठी नाशिकला उपयोगी पडेल. याच अर्थाने सिंहस्थ हा केवळ ‘आजचा मेळा’ नसून, ‘उद्याच्या नाशिकची पायाभरणी’ आहे. धार्मिक श्रद्धेच्या निमित्ताने होणारी ही मोठी गुंतवणूक शहराच्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि नागरी जीवनाला दीर्घकालीन दिशा देईल.
-----------------------
जनसहभाग महत्त्वाचा
प्रशासनाने सुविधा उभारल्या तरी नागरिकांनी स्वच्छता आणि शिस्त पाळली नाही, तर अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही. तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी त्याचा प्रभावी वापर झाला नाही, तर डिजिटल कुंभाची संकल्पना अपुरी ठरेल. धार्मिक संस्थांचा सहभाग नसेल तर सिंहस्थाच्या आध्यात्मिक स्वरूपाला अपेक्षित व्यापकता मिळणार नाही. म्हणूनच सिंहस्थाचे यश ही एका विभागाची जबाबदारी नसून, संपूर्ण नाशिकची सामूहिक जबाबदारी मानून कार्य सुरू आहे.
--
विकासाची नवी पहाट
कुंभमेळ्यानिमित्त एकाच वेळी दोन प्रवाह एकत्र येणार आहेत. एका बाजूला गोदावरी नदीच्या तीरावरची हजारो वर्षांची धार्मिक परंपरा, संत-महंतांची साधना आणि कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे; तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा, ड्रोन सर्व्हेलन्स, जीआयएस- जीपीएस, आधुनिक कमांड सेंटर, हरित तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक नागरी व्यवस्थापन आहे. या दोन प्रवाहांचा समतोल साधणे हेच मोठे आव्हान आणि सर्वांत मोठी संधी असेल. सिंहस्थानिमित्त निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा नाशिकच्या उद्याच्या विकासाचे स्वागत करणारे एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात महत्त्वाच्या शहरांच्या पंक्तीत नाशिक बसणार आहे. या कार्याच्या निमित्ताने नाशिकचा देशात व परदेशात लौकिक होईल, या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्यात येतोय. त्यामुळेच देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून नाशिकचा उदय झालेला असेल, याचा विश्वास आहे.