पान तीन मेन
-------------
सिंहस्थ लोगो घेणे
-----------------
14772, 14773
मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजही सज्ज
सुवर्ण जरी, रेशमी गोंडे, घंटा आणि घुंगरूंनी ध्वजांची सजावट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, या सोहळ्यासाठी मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजही सज्ज झाले आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने ध्वजांची विशिष्ट मापे, पारंपरिक सजावट आणि धार्मिक महत्त्व यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्य धर्मध्वजाची आडवी लांबी १५.५ फूट, तर उभी लांबी ५ फूट आहे. या ध्वजाला चारही बाजूंनी तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. ध्वजाच्या खालच्या बाजूस १५ घंटा, १२ रेशमी गोंडे आणि ३ घुंगरू लावण्यात आले आहेत. सुवर्ण रंगाची जरी आणि पारंपरिक सजावटीच्या घटकांमुळे मुख्य धर्मध्वजाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वजाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ध्वजाची आडवी लांबी ९ फूट, तर उभी लांबी ५ फूट आहे. मुख्य धर्मध्वजाप्रमाणेच या ध्वजालाही चारही बाजूंनी तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. या ध्वजाच्या खालच्या बाजूस ९ घंटा, ६ रेशमी गोंडे आणि ३ घुंगरू लावण्यात आले आहेत. दोन्ही ध्वजांच्या आकारमानानुसार त्यांच्या सजावटीचे नियोजन करण्यात आले आहे.
या ध्वजांची मापे, रचना आणि सजावटीसंदर्भातील माहिती गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त तथा सिंहस्थ समितीचे अध्यक्ष सतीश शुक्ल,अध्यक्ष तथा विश्वस्त चंद्रशेखर पंचाक्षरी,कार्याध्यक्ष विश्वस्त शेखर शुक्ल,सरचिटणीस विश्वस्त प्रतीक शुक्ल आणि उपाध्यक्ष विश्वस्त दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित तसेच ध्वज तयार करणारे दुर्गेश खैरनार यांनी दिली.
-------
दोन दिवस धार्मिक महोत्सव
पंचवटी : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ३० आणि ३१ ऑक्टोबरला धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ३०) रोजी तपोवनातील मोदी मैदानापासून ग्राम परिक्रमा यात्रा काढण्यात येणार आहे. तर शनिवारी (ता. ३१) धर्मध्वजारोहण सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ तथा सिंहस्थ समितीचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल आणि प्रवीण ठाकूर यांनी मंगळवारी (ता.२७) पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी दुपारी दोनला तपोवनातील मोदी मैदानावरून सांस्कृतिक ग्राम परिक्रमा शोभायात्रेला प्रारंभ होईल. शोभायात्रेत रामानंद संप्रदायासह विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांची कलापथके सहभागी होणार आहेत. रामतीर्थ येथे लक्षदीप महाआरती आणि गंगा-गोदावरी पूजनाने सांगता होईल. नाशिककरांसह भाविकांनी या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आले. या वेळी चंद्रशेखर पंचाक्षरी, शेखर शुक्ल, दिलीप शुक्ल उपस्थित होते.
-------