पान तीन
------------
सिंहस्थाचा लोगो वापरणे
---------------
ध्वजारोहणापासून नाशिकच्या सिंहस्थाचा प्रारंभ
---
५१ फुटांचा ध्वज; शिल्पातून उलगडणार अमृतमंथन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : सिंहस्थ कुंभमेळ्यामागे शतकानुशतके चालत आलेली धार्मिक प्रतीकांची परंपरा आहे. या परंपरेत ध्वजाला विशेष स्थान आहे. सिंहस्थ पर्वाच्या प्रारंभाचा धार्मिक संकेत म्हणून ध्वजारोहणाकडे पाहिले जाते. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ध्वजारोहण परंपरेला आधुनिक स्थापत्य आणि धार्मिक प्रतीकांची जोड मिळत आहे. ३१ ऑक्टोबरला १२ वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण होत असून, तयारीला वेग आला.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजस्तंभांची स्वतंत्र रचना निश्चित करण्यात आली असून, रामतीर्थावरील मुख्य ध्वजस्तंभ ५१ फूट, तर त्र्यंबकेश्वर आणि नवीन गोदावरी घाटावरील ध्वजस्तंभ ३१ फूट उंचीचे प्रस्तावित आहेत. यंदाच्या सिंहस्थात मात्र ध्वज, ध्वजस्तंभ आणि सिंहस्थाचे बोधचिन्ह या तीन स्वतंत्र गोष्टी आहेत. ध्वजस्तंभाची स्थापत्यरचना प्रशासनाच्या समन्वयातून होत असताना पताकांची धार्मिक रचना संबंधित पुरोहित संघांच्या सूचनांनुसार निश्चित केली जाईल. सिंहस्थाचे बोधचिन्हही यात असून, त्यात त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरीचे शिवलिंगरूप यांचा वापर करण्यात आला आहे.
---
अमृतमंथन विषयाभोवती फिरणारा ध्वज
यंदाच्या मुख्य ध्वजस्तंभाची संकल्पना ‘अमृतमंथन’ या विषयाभोवती आहे. त्यामुळे ध्वजस्तंभ हा केवळ ध्वज धारण करणारा खांब न राहता सिंहस्थाच्या पौराणिक मुळांची दृश्य मांडणी करणारे एक धार्मिक शिल्प बनेल. ध्वजस्तंभाच्या रचनेत कमळ, अश्व, हत्ती, रत्ने, कल्पवृक्ष, अप्सरा, देवदेवतांची प्रतीके आणि गणपती यांचा समावेश प्रस्तावित आहे. तळभाग कमळाच्या आकाराचा ठेवण्याची संकल्पना असून, वरच्या भागात धार्मिक प्रतीकांची शिल्परचना करण्यात येईल. ध्वजस्तंभासाठी पितळ, तांबे, कांस्य आणि स्टेनलेस स्टील अशा विविध धातूंचा वापर करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे धार्मिक प्रतीकात्मकता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा संगम साधण्याचा प्रयत्न आहे.
---
२०२७ मध्ये तीन ध्वजस्तंभ
ठिकाण प्रस्तावित उंची
रामतीर्थ, पंचवटी ५१ फूट
कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर ३१ फूट
नवीन गोदावरी घाट ३१ फूट
---
तीन गोष्टी, तीन अर्थ
ध्वज : सिंहस्थ पर्वाच्या धार्मिक प्रारंभाचा संकेत.
ध्वजस्तंभ : धार्मिक प्रतीकांची स्थापत्यात्मक आणि शिल्पात्मक मांडणी.
सिंहस्थ बोधचिन्ह : सिंहस्थाची आधुनिक दृश्य ओळख.