दोनदिवस मद्यविक्री बंदी आदेशात बदल
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुधारित आदेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ३० व ३१ ऑक्टोबरला नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. मात्र, या आदेशात बदल करण्यात आला असून रामकुंड तीर्थ परिसरातील दोन किलोमीटर तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील सर्व दुकाने बंद ठेवावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा पर्वास पंचवटीत रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ३१ तारखेला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक महापालिका, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व देशी-विदेशी मद्यविक्री दुकाने ३० व ३१ तारखेला दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. या आदेशानुसार संबंधित क्षेत्रातील देशी दारुची दुकाने, विदेशी मद्यविक्रीची दुकाने तसेच विविध परवान्यांच्या श्रेणीतील मद्यविक्री केंद्रे बंद ठेवावी लागणार होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी गुुरुवारी (ता.२२) सुुधारीत आदेश काढले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या सुधारित आदेशानुसार रामतिर्थापासून दोन किलोमीटर परिघातील तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम ५४ व ५६ नुसार कठोर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.