(पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा फोटो वापरावा)
....
आंतर पार्किंगसाठी ७.४३ हेक्टर जागा निश्चित
तात्पुरत्या भूसंपादनासाठी पोलीस आयुक्तांचा मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी ‘आंतर पार्किंग’ व्यवस्था उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या अंतर्गत पेठ व दिंडोरी रोडवरील मखमलाबाद येथील श्यामसुंदर मिसळसमोरील सुमारे ७.४३ हेक्टर (आर) जागेचे सर्वेक्षण करून तात्पुरत्या भूसंपादनासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंहस्थात सुमारे १० ते १२ कोटी भाविक नाशिक, त्र्यंबकेश्वरला येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक मार्गावर भाविकांच्या वाहनांसाठी बाह्य पार्किंग असणार आहे. तर, बाह्य पार्किंगपासून स्नानासाठी गोदाघाटावर येण्यासाठी शहरात आंतर पार्किंगची सुविधा असेल. भाविकांना येण्यासाठी मोफत बसेस असणार आहे. त्यासाठी जागा निश्चिती करण्यात येत आहे.
कुंभमेळ्यादरम्यान शहरात एसटी व सिटी लिंक बस सेवा, पिकअप पॉइंट आणि होल्डिंग एरियासाठी योग्य पार्किंग स्थळांची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने महसूल विभाग, नाशिक शहर पोलीस, नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम.एस.आर.टी.सी. यांच्या संयुक्त पथकाने मखमलाबाद परिसरातील स्थळांची पाहणी केली होती.
१ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत अंतर्गत पार्किंगसाठी प्रस्तावित जमिनींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून जागा निश्चित करण्यात आली आहे. या निश्चित करण्यात आलेल्या एकूण ७.४३ हेक्टर जागेमध्ये खासगी मालकीच्या जिराईत व पडीत जमिनींसह नाशिक महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांचाही समावेश आहे.
निश्चित करण्यात आलेली जागा विकसित करण्यासाठी सपाटीकरण करणे, बॅरिकेडिंग उभारणे, आगमन व निर्गमन मार्ग आखणे, विद्युतीकरण आणि इतर आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने आपल्या स्तरावरून आवश्यक कालावधी व आराखडा निश्चित करावा, असेही पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.