पास असूनही हुज्जत; नागरिकांशी अरेरावी
ध्वजारोहण, गोदाआरतीला पोलिसांचा सुरक्षेच्या नावाखाली अतिरेक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.३१ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण आणि गोदाआरती सोहळ्याला पोलिसांच्या अवाजवी सुरक्षेचा मोठा फटका नागरिकांना बसला. ‘तगडा बंदोबस्त’ ठेवण्याच्या नावाखाली पोलिसांनी राबविलेल्या कडक धोरणामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. अधिकृत व्हीआयपी आणि प्रवेश पास असूनही पोलिसांनी नागरिकांशी हुज्जत घालत त्यांना रोखून धरल्याने आणि ठिकठिकाणी केलेल्या बेछूट बॅरिकेटींगमुळे सर्वसामान्यांची प्रचंड कोंडी झाली.
ध्वजारोहण व गोदाआरतीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी शहराच्या विविध भागांतून नागरिक गोदाघाटावर आणि सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांकडून झालेल्या अरेरावीमुळे नागरिकांचा उत्साह मावळला. ज्यांच्याकडे प्रशासनाने दिलेले वैध पास होते, त्यांनाही सुरक्षेचे कारण पुढे करत आत सोडण्यास नकार देण्यात आला. ‘पास दाखवूनही पोलिस ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते, उलट हुज्जत घालत होते, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
१६-१
अरुंद रस्ते बंद, पादचाऱ्यांची पायपीट
गोदाघाटाकडे जाणारे आणि जुन्या नाशिकमधील अरुंद रस्ते पोलिसांनी बॅरिकेटींग लावून पूर्णपणे बंद केले होते. वाहनांना बंदी असतानाच पादचाऱ्यांनाही ये-जा करण्यासाठी रस्ता उरला नाही. लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना ऐन उन्हात किंवा गर्दीत दीड-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली.
१६-१
बॅरिकेटींग हटविण्याचा विसर
मुख्य सोहळा पार पडल्यानंतर आणि प्रमुख पाहुणे निघून गेल्यानंतरही पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स काढण्याचे सौजन्य पोलिस यंत्रणेने दाखवले नाही. सोहळा आटोपल्यानंतरही रस्ते बंदच राहिल्याने या परिसरात प्रचंड कोंडी झाली. बंदोबस्त नियोजनासाठी असतो की नागरिकांना त्रास देण्यासाठी? असा सवाल संतप्त नाशिककरांनी उपस्थित केला आहे. अत्यंत अवाजवी बंदोबस्तामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
१६-१
रस्त्यावर एकच गर्दी
राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर, गोदाघाटावरून बाहेर पडणाऱ्यांची एकच गर्दी मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोडसह परिसरातील रस्त्यांवर झाली. तर जागोजागी करण्यात आलेले बॅरिकेटींग अडथळा ठरत असल्याने गर्दीच्या कोंडीत आणखी भर पडली.
---------------