पोलिसांची आजपासून दोन दिवस रंगीत तालीम
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण : रामकुंड, तपोवन परिसरात बंदोबस्ताची चाचपणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२० : सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित धर्मध्वज शोभायात्रा, ध्वजारोहण आणि गोदावरी आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांकडून कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखणे, गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक शहर पोलिसांतर्फे उद्यापासून (ता. २१ व २२) दोन दिवस बंदोबस्ताची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे.
शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडणार आहे. आगामी मुख्य कार्यक्रमांच्या वेळी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणे, बंदोबस्तातील त्रुटी शोधून त्या सुधारणे आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासणे हा या रंगीत तालमीचा मुख्य उद्देश आहे.
शहरात ३० ऑक्टोबरला धर्मध्वज शोभायात्रा व नगरप्रदक्षिणा होणार आहे. तर ३१ ऑक्टोबरला दुपारी रामतीर्थ येथे ध्वजारोहण आणि सायंकाळी गोदाकाठी गोदा आरतीचे आयोजन केले आहे. या दोन्ही दिवशी होणारे सर्व कार्यक्रम सुरक्षित, सुरळीत आणि शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून पूर्वतयारी म्हणून हा विशेष सराव घेण्यात येत आहे.
अशी असेल रंगीत तालीम
- उद्या (ता.२१, सायंकाळी ४ ते ७) : तपोवन ते रामतीर्थ मार्गावर निघणाऱ्या धर्मध्वज शोभायात्रा/नगरप्रदक्षिणा मार्गावरील बंदोबस्ताची आखणी, वाहतूक नियमन व गर्दी नियंत्रणाचा प्रत्यक्ष सराव.
- गुरुवारी (ता. २२, सकाळी ११ ते दुपारी १) : रामतीर्थ परिसरात होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी संपूर्ण पोलिस बंदोबस्तासह सराव.
- गुरुवारी (ता. २२, सायंकाळी ४.३० ते ७.३०) : भाजी बाजार पटांगण परिसर व रामकुंड येथे होणाऱ्या गोदा आरतीच्या दृष्टीने प्रवेश व निर्गमन व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन उपाययोजनांची पडताळणी
कोट
या सरावादरम्यान बंदोबस्ताच्या नियोजनात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींचा अभ्यास करून वेळेवर आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, ज्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी पोलिस बंदोबस्त अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करणे शक्य होईल.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक