एन्कर
फोटो : H32127
शंखनादाचा २५ ऑक्टोबरला जागतिक विक्रम
आयुक्त शेखर सिंह : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी वेगात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक स्थळ, गोदाघाट आणि कुशावर्त तीर्थ येथील सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. स्वच्छता, घाटांचे सुशोभीकरण, भाविकांसाठी मूलभूत सुविधा, वाहतूक नियोजन आणि धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने २५ ऑक्टोबरला शंखनादाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सिंह यांनी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. या वेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, भक्तीचरणदास महाराज, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी आदी उपस्थित होते. सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, आखाडे आणि धार्मिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरक्षितता, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग आणि कार्यक्रमस्थळांवरील व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येणार आहे. धार्मिक संस्थांच्या आवश्यकतांचा आढावा घेऊन कार्यक्रमांची अंतिम रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. कामांमुळे नागरिकांना काही काळ गैरसोय होण्याची शक्यता असली, तरी भाविकांच्या सुविधांसाठी ही कामे महत्त्वाची आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले. ध्वजारोहण सोहळा हा सर्व नाशिककरांचा असल्याने नागरिकांनीही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले
---
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
२५ ऑक्टोबरला होणाऱ्या शंखनादाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे नियोजन आहे. ध्वजारोहण सोहळ्यात त्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होणार आहे. सायंकाळी गोदावरी महाआरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
---
घाटांवरील स्वच्छता, सुविधांवर भर
ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. रामतीर्थ परिसर, गोदावरीचे घाट आणि गांधी तलाव परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. बांधकामांचा राडारोडा हटविणे, फरसबंदी, काँक्रीटीकरण, परिसराचे सुशोभीकरण आणि शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा कार्यान्वित करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. रामतीर्थ आणि कुशावर्त तीर्थ परिसरातील व्यवस्थांचाही नियोजनात समावेश आहे.
---
ग्रामपरिक्रमा
श्री क्षेत्र रामतीर्थ, पंचवटी येथे श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, सिंहस्थ समितीतर्फे ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान महाध्वज प्राणप्रतिष्ठा व ध्वजारोहण सोहळा आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ३ वाजता मोदी ग्राउंड, तपोवन येथून भव्य ग्रामपरिक्रमा निघणार आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, विविध आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर आणि साधू-संत सहभागी होणार आहेत. तपोवन, सावरकर पथ, मेनरोड, रविवार कारंजा, नेहरू चौक आणि मालेगाव स्टँडमार्गे परिक्रमा रामकुंड येथे पोहोचेल. तेथे महाआरतीने सांगता होईल. शनिवारी (ता. ३१) दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी निर्धारित मुहूर्तावर मुख्य ध्वजारोहण होणार आहे. रविवारी धार्मिक विधी, पूर्णाहुती आणि गोदाआरतीने सोहळ्याची सांगता होईल.
---
ध्वजाची वैशिष्ट्ये
*आयताकृती महाध्वज भगव्या रंगाचा
* आयत बृहस्पती आणि भगवा रंग वैराग्याचे प्रतीक
* ध्वजावर सिंहाची प्रतिमा असून ते शूरत्वाचे प्रतीक
* अमृतकुंभ दिव्यसंदेश देणारा
* ध्वजावरील चंद्र, सूर्य काळाचे प्रतीक असून स्वस्तिक विघ्नहर्त्याचे प्रतीक
* ओम आणि श्री हे अनुक्रमे व्यापकता व विजयाचे चिन्ह
* ध्वजाला १२ रेशीम गोंडे असून ते बारा राशींचे प्रतीक
* घुंगरू आणि घंटी हा अंतर्नाद व ब्रह्मनाद प्रतीक .
* महाध्वज हा रेशमी कापडाचा आहे.