टूडे साठी
-----------
सिंहस्थाच्या कामांवरून आयुक्तांचा संताप
गोदाघाटावर जाऊन अधिकाऱ्यांना दिला अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संथगतीने सुरू असलेल्या कामांवरून आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी (ता. १२) अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. पंचवटीतील स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आयुक्त खत्री यांनी थेट गोदाघाटावर जाऊन पाहणी केली आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी होळकर पूल ते रोकडोबा मैदान परिसरातील विकासकामे आणि मूलभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, कचरा संकलन व विल्हेवाट, अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, रस्ते दुरुस्ती, पथदिव्यांची देखभाल, मलनिस्सारण व्यवस्था आणि अग्निसुरक्षा उपाययोजना ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे आणि कामांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास किंवा कुचराई आढळल्यास प्रशासकीय कारवाईचा इशारा आयुक्त खत्री यांनी दिला.
------------चौकट---
जबाबदारी निश्चित
या सोहळ्याच्या संपूर्ण कामांचे संनियंत्रण अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर अतिरिक्त आयुक्त नीलेश भदाणे यांच्यावर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, गोदा आरती समिती, पुरोहित संघाशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
---------------------------------