टूडे साठी
--------------
साधुग्राम आरक्षण स्थलांतरावर
नगरसेवक मुदलियार यांची हरकत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : मौजे नाशिक गट क्रमांक ३४३ च्या भूसंपादन जाहीर सूचनेला नगरसेवक कैलास मुदलियार यांनी आयुक्तांकडे कायदेशीर हरकत नोंदवली आहे. सर्व्हे क्रमांक ३४८ मधील साधुग्राम आरक्षण क्रमांक ९० चे १३ हजार ८८० चौरस मीटर क्षेत्र २०२४ मध्ये गट क्रमांक ३४३ मध्ये स्थलांतरित करताना वैधानिक प्रक्रिया पाळली नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
महापालिकेने साधुग्रामसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली असून, याच गटात पूर्वी आरक्षण स्थलांतर झाले आहे. या स्थलांतराला महासभेने मंजुरी दिली होती. मात्र एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील नियमानुसार शासन आणि नगररचना संचालकांना अहवाल पाठवणे बंधनकारक असताना तो पाठवला आहे का, तसेच स्वतंत्र विकास आराखडा फेरबदलाची गरज होती का, याचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोंदवहीतच पर्यायी जमीन ही मंजुरीतील रचनाबंधात नसल्याची नोंद असताना मंजुरी कशी दिली, दोन्ही जागांमधील अंतर ४८९ मीटर असताना ३०० मीटरच्या विशेष तरतुदीचा आधार कसा घेतला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मूळ जागेला १८ व ३० मीटर रस्ते असताना पर्यायी जागेला केवळ १२ मीटर कच्चा रस्ता आणि ती जागा मलनिस्सारण केंद्रालगत असल्याने सुरक्षेचा तांत्रिक अहवाल मागवण्यात यावा. तसेच नोंदणीकृत हस्तांतरण दस्त, प्रत्यक्ष ताबा, सातबारा नोंदी, हस्तांतरणीय विकास हक्क आणि चटई क्षेत्र निर्देशांकाच्या माध्यमातून दुहेरी मोबदला मिळणार नाही, याची खात्री करावी. हरकतीवर सुनावणी होईपर्यंत अंतिम कार्यवाही स्थगित ठेवावी आणि नियमभंग आढळल्यास स्थलांतर मंजुरी रद्द करावी, अशी मागणी मुदलियार यांनी केली आहे.
----------------------