टूडे साठी
-----------
महापालिकेला
४ कोटींचा भुर्दंड
नाशिक : जुना गंगापूर नाका ते मखमलाबाद रोडमार्गे पेठ रोडपर्यंतच्या विकास आराखड्यातील रस्त्यासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या वाढीव मोबदल्यापोटी महापालिकेला तब्बल ४ कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मौजे नाशिक येथील सर्व्हे क्रमांक ८७/२/२ मधील सुमारे २,१०० चौरस मीटर जमीन २४ मीटर आणि ३० मीटर रुंद रस्त्यासाठी संपादित केली होती. २६ ऑक्टोबर २००७ रोजी अंतिम निवाडा जाहीर झाला होता. मात्र मोबदल्यावर असमाधान व्यक्त करत जमीनमालकांनी २००८ मध्ये जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. वाढीव मोबदल्याची रक्कम वेळेत जमा न झाल्याने जमीनमालकांनी दरखास्त दाखल केली आहे. रक्कम जमा न केल्यास जप्तीचे वॉरंट निघण्याची शक्यता नगर नियोजन विभागाने व्यक्त केली आहे. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक दोन यांनी ३१ मे २०२६ पर्यंतची परिगणना केली असून त्यानुसार न्यायालयात ४ कोटी ११ लाख ९५ हजार २११ रुपये आणि आयकर विभागाकडे ३१ लाख ३८ हजार २३८ रुपये जमा करावे लागणार आहेत. प्राधान्यक्रम समितीने २४ जून २०२६ रोजी या रकमा भरण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर असून निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
---------------------