जिल्ह्यात २०७ भूमिहीनांना हक्काचे छप्पर
जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार : चार तालुक्यांतील जमिनी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ :
घरकुलापासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबांसाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजनेंतर्गत बागलाण, मालेगाव, सिन्नर व येवला या चार तालुक्यांतील २०७ पात्र भूमिहीन कुटुंबांना घरकुलासाठी शासकीय जमिनी विनामूल्य मंजूर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यासंदर्भात आदेश काढले. त्यामुळे ऐन दिवाळीत या कुटुंबांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वतःची जागा नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना झोपड्यांमध्ये, अतिक्रमित जागांवर किंवा इतरांच्या जमिनीवर निवारा शोधावा लागत होता. घरकुल योजनेचा लाभ मंजूर होऊनही जागेअभावी घर बांधता येत नसल्याने या कुटुंबांची अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी महसूल विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समन्वयातून विशेष प्रयत्न केले.
---
जमिनींचे हस्तांतरण
मंजूर केलेल्या जमिनींचे भूखंड संबंधित ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्यात आले आहेत. नियमानुसार निवासी अभिन्यास मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना भाडेपट्ट्याने अथवा प्रचलित धोरणानुसार जमिनीचे वितरण करण्यात येईल. लाभार्थ्यांच्या नावावर यापूर्वी कोणतेही घर किंवा भूखंड नसल्याची खातरजमा करूनच प्रत्यक्ष ताबा देण्याचे निर्देश संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
---
- बागलाणमध्ये सर्वाधिक ९४ कुटुंबांना लाभ
- मालेगावमध्ये ७८ कुटुंबांना हक्काची जागा
- सिन्नरमध्ये १० कुटुंबांना मिळणार छप्पर
- येवला तालुक्यात २५ कुटुंबांना जमीन मंजूर
-----------------