शासकीय विभागीय ग्रंथालयात
सभासद नोंदणी अभियान
९७ हजार ग्रंथांचे ज्ञानभांडार; नव्या ग्रंथांचे प्रदर्शनही खुले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाशिकच्या शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचकांसाठी सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. वाचक, अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, विद्यार्थी, महिला, बालक तसेच दिव्यांग वाचकांना याचा लाभ घेता येणार आहे.
नाशिक विभागातील महत्त्वाचे संदर्भ ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची ओळख असून, सध्या येथे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ९७ हजारांहून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय २० दैनिके, २१ नियतकालिके आणि दरवर्षी सुमारे ६० दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जातात. चरित्रे, संदर्भग्रंथ, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, महिला व बालवाङ्मय तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक ग्रंथांचा समावेश या संग्रहात आहे. ग्रंथालयाच्या वाचनकक्षात कार्यालयीन वेळेत ग्रंथ, वृत्तपत्रे आणि नियतकालिके वाचण्याची सुविधा मोफत आहे. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन ९ ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत वाचक, ग्रंथप्रेमी, साहित्यिक, संशोधक आणि अभ्यागतांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले यांनी दिली आहे.
---
१९७४ मध्ये स्थापना
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमातील तरतुदींनुसार २९ जुलै १९७४ रोजी शासकीय विभागीय ग्रंथालयाची स्थापना झाली. १९७८ पासून हे ग्रंथालय नाशिक रोड येथील जवाहर मार्केटमधील महापालिकेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कार्यरत आहे. सप्टेंबर २०२६ अखेर ग्रंथालयाचे ३५७ वैयक्तिक आणि ४३ संस्था सभासद आहेत. सभासदांना संदर्भग्रंथ वगळता अन्य ग्रंथ देव-घेव पद्धतीने वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात.