साहित्य स्पर्धांचे निकाल
जाहीर; रविवारी वितरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : सार्वजनिक वाचनालय आयोजित ५७ व्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घेतलेल्या विविध साहित्य स्पर्धांचे निकाल जाहीर केले आहेत. काव्य, कथा, विनोदी कथा, कविता संग्रह, कथा संग्रह आणि बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांतील पुरस्कारप्राप्त लेखक व कवींची नावे वाचनालयातर्फे घोषित केली असून रविवारी (ता. १८) होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
कवी गोविंद काव्य स्पर्धेत संजय आहेर यांच्या ‘स्ट्रॉबेरी’ या कवितेला प्रथम, सुधाकर नथू भामरे यांच्या ‘येऊन जा तू भेटून जा’ या कवितेला द्वितीय, तर तुकाराम सीताराम ढिकले यांच्या ‘आयुष्याला भिडणे बाकी आहे’ या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला. डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत डॉ. राजेंद्र चंद्रभान कमानकर यांच्या ‘केअर टेकर’ या कथेला प्रथम, तर अविनाश गडवे- औटी यांच्या ‘स्वीटकॉर्न’ या कथेला द्वितीय क्रमांक मिळाला. कै. चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धेत ॲड. संगीता वसंत पाटील यांच्या ‘मेकओव्हर’ या कथेला पुरस्कार जाहीर झाला. कै. जयश्री राम पाठक कविता संग्रह स्पर्धेत दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या कविता संग्रहाची, तर श्रीमती मधुवंती अशोक केंघे कविता संग्रह स्पर्धेत रवींद्र दळवी यांच्या ‘दिवाबत्ती’ या संग्रहाची निवड झाली. याच नावाने आयोजित कथा संग्रह स्पर्धेत उद्देश शेवाळे यांच्या ‘एकायतन’ या संग्रहाला पुरस्कार जाहीर झाला. लक्ष्मीबाई टिळक बालसाहित्य स्पर्धेत राजेंद्र दिघे यांच्या ‘पाखरांची गाणी’ या बालसाहित्यकृतीची निवड करण्यात आली. या स्पर्धांचे परीक्षण जी. पी. खैरनार, राधिका गोडबोले, प्र. द. कुलकर्णी, रवींद्र मालुंजकर, वैद्य नीलिमा जाधव आणि प्रशांत केंदळे यांनी केले.