नाशिक : शिर्डी- त्र्यंबक- ओझर- सिन्नरपर्यंत मेट्रो विस्तारीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik metro

नाशिक : शिर्डी- त्र्यंबक- ओझर- सिन्नरपर्यंत मेट्रो विस्तारीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात टायरबेस मेट्रोची घोषणा झाली असली तरी अद्याप कामाच्या उद्‌घाटनाचा नारळ वाढविलेला नाही. परंतु, रस्ते विस्तारीकरण, धार्मिक स्थळे, औद्योगिक वसाहत व विमानतळापर्यंत वेगाने पोचण्यासाठी मेट्रोचे विस्तारीकरण महापालिका हद्दीपासून तीस किलोमीटरपर्यंत शक्य असल्याने त्या दृष्टीनेदेखील विचार सुरू झाला आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोमार्फत झाले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली. त्यानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राइटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगस्ट २०१९ मध्ये ‘मेट्रो निओ’ असे प्रकल्पाचे नामकरण झाले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००. ६ कोटी खर्च येणार असून, राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, तर १,१६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहेत.

प्रकल्प उभारणीसाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. कोरोनामुळे मेट्रो निओ प्रकल्पाचा प्रवास लांबला; परंतु त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चार ते पाच बैठका झाल्या. २०२३ पर्यंत मेट्रो प्रकल्पाची मुदत असली तरी कोरोनामुळे सर्वच प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आल्याने आता मेट्रोचा प्रकल्पदेखील लांबणार आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याने प्रकल्प होईलच, परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी न मिळाल्याने फाइलचा प्रवास रखडला आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

प्रवासी व सेवेची उद्दिष्ट

नाशिक रोडच्या शिवाजी पुतळा येथे मेट्रो निओचे स्टेशन आहे. सिन्नर फाटा येथे मेट्रो, महारेल व सिटीलिंक कंपनीचे एकच मल्टिमोडल हब तयार केले जाणार असल्याने मेट्रोची लांबी हबपर्यंत वाढविली जाणार आहे. त्यासाठी साठ ते सत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोचा विस्तार नाशिक प्रादेशिक क्षेत्रात अर्थात एनएमआरडीए क्षेत्रात केला जाणार आहे. सिन्नरपर्यंत पुणे महामार्गाचा विस्तार करण्यात आल्याने सिन्नर औद्योगिक वसाहत, तसेच पुढे शिर्डीपर्यंत विस्तार होऊ शकतो. पपया नर्सरीपासून पुढे त्र्यंबकपर्यंत, तर ओझर विमानतळापर्यंतदेखील टायरबेस मेट्रोचा विस्तार शक्य होणार आहे. सेवा विस्ताराच्या माध्यमातून प्रवासी व सेवेची दोन्हीची उद्दिष्टे साध्य होतील.

loading image
go to top