पान तीन सेकंड मेन
----------------
महामेट्रोचा सर्वंकष आराखडा महापालिकेला सादर
आगामी तीस वर्षांचा विचार, ५८ किलोमीटरचा कॉरिडॉर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २७ : शहराचा वाढता विस्तारामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आवशक्यता वाढणार आहे. त्याअनुषंगाने महामेट्रोने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला असून महापालिकेला सादर केला आहे. आराखडा तयार करताना लोकसंख्या, वाढत्या वाहनांच्या संख्येबरोबरच प्रवासाच्या बदलत्या साधनांचा देखील विचार करण्यात आला आहे. यामध्ये ५८ किलोमीटरचा कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. एकूण २६ हजार ८३८ कोटींचा आराखडा आहे.
२०५६ पर्यंत शहराच्या वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने महामेट्रोकडे सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन) तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यापूर्वी जुलैत विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत वाहतुकीच्या दृष्टीने नोंदविलेल्या नोंदीची माहिती देण्यात आली होती. त्याअनुषंगाने महामेट्रोने आराखडा सादर केला आहे.
-------------------
५८ किलोमीटरचा कॉरिडॉर
सर्वंकष वाहतुकीचा आराखडा तयार करताना वाढती लोकसंख्या, सार्वजनिक जमिनीचा वापर, वाहनांची संख्या प्रवासाच्या बदलत्या पद्धतीचा विचार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, आयपीटी आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट यांचे एकत्रीकरण करून आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात ५८.०८ किलोमीटर एमआरटीएस कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. शहर बससेवा बळकट करण्यासाठी १ हजार ३३९ नवीन बसेस, १२३ किलोमीटरचे सर्क्युलर बस मार्ग, ७५.३३ किलोमीटरचे फीडर मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे.
नाशिकचे महत्त्व लक्षात घेऊन कुंभमेळा मोबिलिटी स्ट्रॅटेजी आराखड्यात समाविष्ट आहे. बाह्य रिंग, पार्किंग, शटल सेवा, पंचवटी-रामतीर्थ-संगम घाट परिसरात पादचारी प्राधान्य, बहुभाषिक सूचना फलक, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन मार्गांचा समावेश आहे. भाविक व पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक बळकटीकरण, वाहतूक मार्गांचे नियोजन, पार्किंग व होल्डिंग एरिया, पादचारी व्यवस्थापन व प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत सुलभ संपर्क व्यवस्थेचा विचार करण्यात आला आहे.
----------------------
एकात्मिक वाहतूक व्यवस्था
५८ किलोमीटरची वेगवान सामूहिक वाहतूक व्यवस्थेचा आराखड्यात समावेश आहे. या मध्ये गंगापूर-नाशिक रोड रेल्वे स्थानक (२१.५० किलोमीटर), गंगापूर-मुंबई नाका-पाथर्डी फाटा (१३.९८ कि.मी.), ओझर विमानतळ मार्ग-मुंबई नाका-पाथर्डी फाटा-अंबड (२३ कि.मी.) या मार्गिकांना शहर बस, फीडर सेवा आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांची जोड देऊन एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारली जाणार आहे. रिंग रोड, रस्त्यांच्या मिसिंग लिंक पूर्ण करणे, प्रमुख रस्त्यांचे बळकटीकरण, पादचारी आणि सायकलस्वारांसाठी १३१ किलोमीटर पादचारी सुविधा, ८८ कि.मी. स्वतंत्र सायकल मार्गिका, गोदावरी नदीकाठ परिसरात पादचारी व सायकल मार्ग विकसित करणे, प्रमुख चौकांची सुधारणा, मालवाहतूक व्यवस्थापन, ट्रक टर्मिनल्स उभारणे, ऑन-स्ट्रीट व ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे नियोजन करण्याचा आराखड्यात समावेश आहे.