
नाशिक महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार
नाशिक : महापालिका निवडणुका वेळेत होतील की नाही यावर गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचा आरक्षण विरहित प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेचा आरक्षण विरहित प्रारूप आराखडा मंगळवारी (ता. १) जाहीर केला जाणार आहे. त्याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकांसाठीचा हा पहिला व महत्त्वाचा टप्पा असल्याने त्याअनुषंगाने निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे.
हेही वाचा: लसीकरणाने मिळाला अर्थव्यवस्थेला बूस्टर
नाशिक महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कोरोना, आरक्षणाच्या गोंधळामुळे अद्यापपर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणूक झाल्यास आतापर्यंत आचारसंहिता लागू होणे अपेक्षित होते, परंतु तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली. ६ जानेवारीला प्रभागरचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाबाबत ८ फेब्रुवारीला निर्णय होणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होईल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचा प्रारूप प्रभागरचनेचा १ फेब्रुवारीला जाहीर करण्याचे घोषित केले. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असून, याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जातील. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
१५ मार्चलाच मुदत संपणार
नाशिक महापालिकेची पंचवार्षिक मुदत १५ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानुसार १ मार्चला महापौर, उपमहापौर कार्यालयाला त्यासंदर्भातील पत्र नगरविकास विभागाकडून प्राप्त होईल. या कालावधीत निवडणूक न झाल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. परंतु, त्यापूर्वीच प्रशासकीय राजवट लागू होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु, महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात येत नाही. तोपर्यंत प्रशासकीय राजवट लागू होणार नाही. त्यापूर्वी प्रशासक बसवायचा असल्यास महापालिका बरखास्त करावी लागेल. परंतु बरखास्ती शक्य नसल्याने प्रशासक बसविण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा: नागपूर : ४६ शिक्षकांनी जमा केले टीईटी प्रमाणपत्र
विभागीय कार्यालयात आराखडे
दरवेळी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्याचा कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये होतो. प्रभाग आरक्षणाची सोडतही येथेच काढली जाते. परंतु कोरोनामुळे महापालिका मुख्यालयात मुख्य कार्यक्रम व सहाही विभागीय कार्यालयांत त्या-त्या विभागातील प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याशिवाय महापालिकेच्या वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे.
एप्रिलमध्ये निवडणूक?
१ फेब्रुवारीला प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविल्यानंतर राज्य निवडणूक
आयोगाकडे अहवाल सादर करण्यापर्यंत साधारण फेब्रुवारी अखेर प्रभागरचना अंतिम केली जाईल. यादरम्यान मतदार याद्यांचे भागनिहाय विभाजन होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यास पुढील ४५ दिवसांत एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा: Uttarakhand Election: रस्ता नसल्याच्या निषेधार्थ मतदार ‘नोटा’ वापरणार
असा आहे प्रभागरचनेचा कार्यक्रम
१ फेब्रुवारी : निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.
१ ते १४ फेब्रुवारी : प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविणे.
१६ फेब्रुवारी : प्राप्त हरकती व सूचनांचे विवरण पत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे.
२६ फेब्रुवारी : राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर हरकती व सूचनांवर सुनावणी.
२ मार्च : सुनावणीनंतर शिफारशींसह राज्य निवडणूक आयोगाला अहवाल पाठविणे.
Web Title: Nashik Municipal Corporation Election Trumpet Will Sound Outline On Corporation Web Site
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..