नाशिकमधील 22 रुग्णालयांची मान्यता होणार रद्द? तीन दिवसांत मागीतला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

नाशिक शहरातील 22 रुग्णालयांना मान्यता रद्द करण्याची नोटीस

नाशिक : कोरोना (Corona) रुग्णांवर उपचार केल्यानंतर आकारलेली बिले तपासणीसाठी सादर न केल्याने महापालिकेने शहरातील 22 खासगी रुग्णालयांना मान्यता रद्द करण्याच्या नोटीस बजावल्या असून, तीन दिवसात कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाधानकारक खुलासा न केल्यास मान्यता रद्द केली जाणार आहे. (Nashik Municipal corporation has issued de-recognition notices to 22 private ospitals in the city)


कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गर्दी होवू लागली. त्याचबरोबर उपचाराअंती आकारलेल्या बिलाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक रुग्णालयात लेखा परिक्षकांची (Auditor) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पहिली लाट ओसरली. त्यानंतर फेब्रुवारी अखेरपासून दुसरी लाट सुरू झाली. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने विक्रमी पातळी ओलांडली. या काळात रुग्णालयांमध्ये बेड मिळत नव्हते. बिलासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने लेखा परिक्षकांची पुर्ननियुक्ती करण्यात आली. आता मे महिन्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रशासकीय ऑडिट सुरू केले आहे.

खासगी रुग्णालयांना यासंदर्भात माहिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर आता ज्या खासगी रुग्णालयासंदर्भात आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या रुग्णालयांची उलटतपासणी सुरू केली आहे. कोविड सेंटर म्हणून जाहीर झालेल्या रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवण्याबरोबरच राखीव बेडवरील उपचाराचे शासकीय दर निश्‍चित केले होते. शासकीय दरानुसार रुग्णांना बिल न आकारणे, 80 टक्के बेडवरील रुग्णसंख्या कमी दर्शवून जादा दराने बिल वसूल करणे, आदी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार 53 खासगी रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यात मार्च ते मे या महिन्यातील रुग्णसंख्या 80 व 20 टक्के बेडवर उपचार घेतलेल्या रुग्णांची देयके, डिस्चार्जची यादी सादर करण्याच्या सूचना होत्या. 31 खासगी रुग्णालयांनी महापालिकेच्या लेखा विभागाकडे यादी सादर केली होती. परंतु, अद्यापही 22 खासगी रुग्णालयांनी बिले सादर करण्यास नकार दिल्याने अशा खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 22 खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा: अखेर पंचवटी एक्स्प्रेस होणार सुरू! नाशिक-मुंबई प्रवास सोयीचा


जादा दराचा खुलासा

गंगापूर रोडवरील गांगुर्डे हॉस्पिटलने 15 रुग्णांकडून 1 लाख 53 हजार, तर औरंगाबादरोडवरील समृद्धी रुग्णालयाने 12 रुग्णांकडून 18 हजार 550 रुपये अतिरिक्त आकारल्याचे उलट तपासणीतून स्पष्ट झाले. आकारलेल्या जादा आकारलेल्या रकमेचा परतावा करावा, तसेच जादा रक्कम का आकारली याबाबत लेखा परिक्षण विभागाने खुलासा मागविला आहे.

खासगी रुग्णालयाकडून जादा बिले आकारल्याच्या तक्रारीनुसार रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. या बिलांची उलट तपासणी केलेली जात असून, कागदपत्रे सादर न करणाऱ्या रुग्णालयांची मान्यता रद्द केली जाणार आहे.
- बोधीकिरण सोनकांबळे, मुख्य लेखापरीक्षक, महापालिका
(Nashik Municipal corporation has issued de-recognition notices to 22 private hospitals in the city)

हेही वाचा: नाशिक महापालिकेची बनावट वेबसाईट? नागरिकांची फसवणूक

Web Title: Nashik Municipal Corporation Has Issued De Recognition Notices To 22 Private

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ghati HospitalNashik