esakal | नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट
sakal

बोलून बातमी शोधा

Oxijan

नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी गंगापूर व मोरवाडी येथे प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटच्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.

शहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्सिजनचा होणारा अपुरा पुरवठा होत आहे. यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मोरवाडी येथील ‘यूपीएससी’च्या बाजूच्या मोकळ्या मैदानाचे व प्रबोधनकार ठाकरे सभागृहाबाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच गंगापूर ‘यूपीएससी’ बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या एअर ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन महापालिकेचे असून, त्यामुळे शहरात जाणवणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषधसाठ्याची माहितीही आयुक्त जाधव यांनी घेतली. तसेच गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषधसाठा व रुग्णांना महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे आदी उपस्थित होते.

आयुक्तांच्या पाहणीवरून भाजपची नाराजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून महापौरांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. मात्र आयुक्त जाधव यांच्याकडून कुठलाही निर्णय घेताना महापौरांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत भाजपकडून व्यक्त करण्यात आली. भाजपचे महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील यांनी याचा निषेध केला. ते म्हणाले, की आयुक्तांना दिलेल्या साथ रोगाच्या विशेष अधिकाराचा दुरुपयोग करून ते एकतर्फी निर्णय घेतात. मात्र काही दुर्घटना घडल्यास भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला जबाबदार धरले जाते. त्यामुळे प्रशासनाचा या एकतर्फी कारभाराचा मी निषेध करतो.

loading image