महापालिकेचा दिव्याखाली अंधार |Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यालयातच मास्क न घालणाऱ्यांची वाढली संख्या

नाशिक : महापालिकेचा दिव्याखाली अंधार

नाशिक : कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू केली असली तरी महापालिकेच्या मुख्यालयामध्येच मोठ्या प्रमाणात मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे कर्मचारी विनामास्क फिरत असल्याचे आढळून येत असून, मंगळवारी (ता.९) केलेल्या अचानक पाहणीत ११ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोना पहिली व दुसरी लाट संपुष्टात आल्यानंतर आता संभावित तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अद्याप तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत नसले तरी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासाठी बाजारपेठेमध्ये महापालिकेकडून प्रत्येकी दोन, असे सहा विभागात १२ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. मास्क घालणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड ठोठावला जात आहे.

हेही वाचा: नाशिक : संपामुळे सिटीलिंक कंपनीच्या तिजोरीत विक्रमी उत्पन्न

सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्याबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येदेखील अचानक पाहणी करून मास्क परिधान न करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना आहे. मात्र, अशा प्रकारची कारवाई करताना महापालिका मुख्यालयात मास्क परिधान होते की नाही, याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी अचानक पाहणी केली. त्यात विविध विभागांमध्ये ११ कर्मचारी व नागरिकांनी मास्क परिधान न केल्याचे आढळून आले. त्या सर्वांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेल्मेट बरोबर मास्क सक्ती

पोलिस आयुक्तांनी सरकारी कार्यालयांमध्ये प्रवेश करताना हेल्मेटसक्ती केली आहे. आता त्याच्या जोडीला महापालिका आयुक्तांनी मास्क परिधान करणे सक्तीचे केले आहे. महापालिका मुख्यालयाबरोबरच महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्येदेखील मास्क परिधान करणे बंधनकारक असून, अन्यथा दंडात्मक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.